देशातील पहिली आर. बी.डी. प्लाझ्मा बँक नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:17 PM2020-09-08T23:17:51+5:302020-09-08T23:21:57+5:30
भारतातील पहिल्या आर.बी.डी. प्लाझ्मा बँक व कोरोना आर.बी.डी. अँटीबॉडी चाचणी केंद्र नागपुरात सुरू झाले. आरबीडी-अँटीबॉडीचे जास्त प्रमाण असलेला प्लाझ्मा कोविड रुग्णाला दिल्यास अँटीबॉडी ताबडतोब कोरोना विषाणूला निष्प्रभावी बनवतात. रुग्णातील रोगप्रतिकारक यंत्रणा स्वत:ची अँटीबॉडी तयार करण्याआधीच रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. या प्लाझ्मा बँक व चाचणी केंद्राच्या मदतीने कोरोनावरील उपचारात एक नवीन आशाजागविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतातील पहिल्या आर.बी.डी. प्लाझ्मा बँक व कोरोना आर.बी.डी. अँटीबॉडी चाचणी केंद्र नागपुरात सुरू झाले. आरबीडी-अँटीबॉडीचे जास्त प्रमाण असलेला प्लाझ्मा कोविड रुग्णाला दिल्यास अँटीबॉडी ताबडतोब कोरोना विषाणूला निष्प्रभावी बनवतात. रुग्णातील रोगप्रतिकारक यंत्रणा स्वत:ची अँटीबॉडी तयार करण्याआधीच रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. या प्लाझ्मा बँक व चाचणी केंद्राच्या मदतीने कोरोनावरील उपचारात एक नवीन आशाजागविली आहे. रविवारी या केंद्राचे उद्घाटन लाईफ लाईन रक्तपेढी येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे सीइओ योगेश कुंभेजकर, मेडिकलचे अधिष्ठाता, डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व आरबीडी प्लाझ्मा बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. आरबीडी प्लाझ्मामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी ठाकरे यांनी व्यक्त के ला.-आर.बी.डी. अँटीबॉडी म्हणजे काय? डॉ. वरभे यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर अनेक काटे असतात. या काट्यांच्या टोकावर आर.बी.डी. (रिसेप्टर बाईंडिंग डोमेन) हे क्षेत्र असते, जे श्वसन संस्थेच्या पेशींवरील रिसेप्टर्सला चिटकते व पेशींच्या आत प्रवेश करून त्यांची संख्या वाढवते. मुक्त झालेले अनेक विषाणू पुन्हा नवीन पेशी संक्रमित करतात. परिणामी, रुग्ण आजारी पडतो. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती हा विषाणू ओळखतो आणि त्याच्या अनेक अंगाविरुद्ध अँटीबॉडी बनवितो (न्यूक्लियोकॅप्सिड, स्पाइक आणि आर.बी.डी. / रिसेप्टर बाँडिंग डोमेन). सर्वांमध्ये आर.बी.डी. अँटीबॉडी ही सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली असते. कारण ही रिसेप्टर्सशी व्हायरसचे जुळणे रोखते. त्यामुळे विषाणू पेशींच्या आत जाऊ शकत नाही आणि वाढू शकत नाहीत. विषाणू पेशीच्या बाहेर जिवंत राहू शकत नसल्यामुळे मारला जातो आणि रुग्ण बरा होतो. म्हणूनच जगातील अनेक संशोधनानुसार आरबीडी हीच संरक्षक अँटीबॉडी आहे. आर.बी.डी. अँटीबॉडी चाचणी आवश्यक आरबीडी-अँटीबॉडीची चाचणी न करता कन्व्हेलेसेन्ट प्लाझ्मा दिल्यास रुग्णाला अपेक्षित फायदा होण्याची शक्यता कमी होते, हानी पोहचण्याची शक्यातही असते. कारण, कोविड आजारातून बऱ्या झालेल्या १० रुग्णांपैकी केवळ ३-४ मधेच ‘१ : ६४०’ किंवा त्याहून अधिक आरबीडी-अँटीबॉडी ची पातळी मिळते. यामुळे आरबीडी-अँटीबॉडी चाचणी गरजेची असल्याचेही डॉ. वरभे यांनी सांगितले. प्लाझ्मा दानासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी समोर यावे कोरोनाला हरवून बरा झालेला रुग्ण, प्लाझ्मा दान करून दुसऱ्या एका रुग्णाला जीवनदान देऊ शकतो. यामुळे जास्तीत जास्त कोरोनाच्या योद्ध्यांनी पुढे येण्याचे आवाहन डॉ.वरभे यांनी के ले. ते म्हणाले, यामुळे, अधिक आरबीडी-अँटीबॉडी पातळी असलेला योग्य दाता निवडण्यास मदत होऊन याचा फायदा रुग्णाला होईल.