वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना
By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2024 16:53 IST2024-06-22T16:53:04+5:302024-06-22T16:53:33+5:30
मुलगा नसल्याने मुलीच करीत होत्या सांभाळ

वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना
नागपूर : मुलगा नसल्यामुळे पाच मुलीच आईवडिलांचा सांभाळ करायच्या. परंतु वय झाल्यामुळे किती दिवस मुलींच्या घरी राहून त्यांना त्रास द्यायया, असा विचार करून एका वृद्ध दाम्पत्याने मुलीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
श्रीराम बापूराव कटरे (८५) आणि शकुंतला श्रीराम कटरे (८२, रा. यशोदानगर रुक्मिणीनगर, अमरावती) असे गळफास घेतलेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. श्रीराम हे अमरावतीत यशोदानगरात पत्नी शकुंतला सोबत राहत होते. त्यांना पाच मुली असून मुलगा नाही. मुलींचे लग्न झाल्यानंतर श्रीराम आणि त्यांची पत्नी एकाकी पडले. दोघेही वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची तब्येतही बरी राहत नव्हती. एकाकीपणामुळे दोघेही आपल्या मुलींकडे जाऊन राहत असत. मुलीच त्यांचा सांभाळ करू लागल्या.
२६ मे २०२४ रोजी ते चंदनगर येथे राहणारी विधवा असलेली मोठी मुलगी ज्योती श्रीराम पारधी (६४) हिच्याकडे आले होते. महिनाभरापासून ते मुलीच्या घरीच राहत होते. परंतु मुलीकडे किती दिवस रहायचे, असा विचार नेहमीच त्यांच्या मनात यायचा. याबद्दल ते नातेवाईकांकडे बोलूनही दाखवायचे. शुक्रवारी त्यांची मुलगी ज्योती हिच्या पुतण्याचा वाढदिवस असल्यामुळे त्या अलंकारनगरला गेल्या. कटरे दाम्पत्याने त्यांच्यासोबत जाण्यास मनाई केली. मुलगी घरी नसल्याचे पाहून दोघाही पती-पत्नीने मुलीच्या घरी सिलींग फॅनला साडी बांधुन गळफास घेतला. मुलगी आल्यानंतर तिला आईवडिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच तिने हंबरडा फोडला. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करू तपास सुरु केला आहे.