पुण्यातील 'बंटी बबली'ला नागपुरात अटक; २७.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 03:14 PM2022-12-30T15:14:27+5:302022-12-30T15:15:23+5:30
येरवड्यात केली होती चोरी : वाडीत गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : पुण्यातून चोरी करून नागपुरात येणाऱ्या एका दांपत्याला नागपुरातून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या दांपत्याने येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणी नगर येथून चोरी केली होती. कल्याणी नगरातील कुमार सिटी येथील रहिवासी राजपाल वामन हारगे (३९) व उर्मिला हारगे (३८) अशी आरोपींची नावे आहेत.
कल्याणी नगर येथील सूरज सिटी येथे सूरज समरचंद अग्रवाल हे राहतात. ते कुटुंबीयांसह अलिबाग येथे फिरायला गेले होते. २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ते गेल्यावर चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावरून खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने व रोकड असा एकूण ४७ लाख ३६ हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरी झाल्याची बाब समोर येताच अग्रवाल यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना हारगे दांपत्य यात सहभागी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला असता, ते नागपूरच्या मार्गे निघाले असल्याचे समोर आले.
दोन्ही आरोपी येरवडा पोलिस ठाण्याच्या हवाली
नागपुरातील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला व गुरुवारी दुपारी अमरावती मार्गावरील वाडी येथून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी २.५८ लाख रोख व २४.८९ लाखांचे दागिने असा २७ लाख ४७ हजारांचे दागिने जप्त केले. दोन्ही आरोपींना येरवडा पोलिस ठाण्याच्या पथकाच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक राहुल शिरे, गणेश पवार, संतोष ठाकूर, संतोष मदनकर, राजेश तिवारी, रामनरेश यादव, महेंद्र सडमाके, आशिष ठाकरे, सचिन आंधळे, सुनील कवर, कमलेश गहलोत, शेषराव राऊत, आरती चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.