भंडाऱ्याजवळ मालगाडीची कप्लिंग तुटली, रेल्वे वाहतूक प्रभावित
By नरेश डोंगरे | Published: October 30, 2022 10:28 PM2022-10-30T22:28:15+5:302022-10-30T22:29:04+5:30
भंडाऱ्याजवळ रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.
नागपूर: दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात मालगाडीच्या वॅगनला जोडणारी कपलिंग तुटली. भंडाऱ्याजवळ रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भंडारा - खात रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या मालगाडीच्या दोन वॅगनदरम्यानची कप्लिंग अचानक तुटली. चालकाच्या ते लक्षात आल्यानंतर लगेच मालगाडी थांबवण्यात आली. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर तातडीने मदत चमू पाठवण्यात आली. दरम्यान, तोपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या मालदा टाऊन - सूरत एक्सप्रेस आणि हावडा पोरबंदर एक्सप्रेस भंडारा रेल्वे स्थानकावर पोहचल्या होत्या. त्यांना सुमारे अर्धा तास तेथेच थांबवून ठेवण्यात आले. तिकडे दुरूस्तीचे काम करून हा रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला.
मालगाडीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित होण्याची गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी घटना होय. गेल्या रविवारी बडनेरा (अमरावती) जवळ एका मालगाडीचे कोशाने भरलेले डबे रुळावरून घसरले. त्यामुळे नागपूर-मुंबई आणि मुंबई नागपूर लोहमार्गावरची वाहतूक प्रभावित झाली. त्यामुळे १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर ४१ गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले होते. तब्बल ३४ दिवसांनंतर या मार्गावरची वाहतूक पुर्ववत झाली. आता परत ही घटना घडली.