विवाहितेचे आरोप निराधार.. हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द; अमेरिकन दिराला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 01:35 PM2022-05-07T13:35:39+5:302022-05-07T13:50:46+5:30
विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती, दीर व सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, अपमानित करणे व ठार मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता.
नागपूर : विवाहितेने केलेले हुंड्यासाठी छळ व इतर विविध आरोप निराधार अन् मोघम स्वरूपाचे आढळून आल्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या दिरासह सासूविरुद्धचा वादग्रस्त एफआयआर आणि संबंधित खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
हे प्रकरण अमरावती येथील आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती, दीर व सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, अपमानित करणे व ठार मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता, तसेच प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता. दीर व सासूने हा एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्यातर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली. विवाहितेचे मुख्य आरोप पतीविरुद्ध आहेत. दीर व सासूवरील आरोपात काहीच तथ्य नाही. दीर अमेरिकेत राहतो. तो तेथून भावाला फोन करून फिर्यादीचा छळ करण्याची चिथावणी देत होता, हा आरोप विश्वसनीय वाटत नाही, तसेच सासूविरुद्धचे आरोपही मोघम आहेत, याकडे ॲड. डागा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे याचिका मंजूर करण्यात आली.
केवळ पतीविरुद्ध खटला चालेल
सदर निर्णयामुळे आता केवळ पतीविरुद्ध खटला चालेल. या दाम्पत्याचे १६ नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न झाले. परंतु, त्यांचे सतत वाद होत होते. त्यामुळे फिर्यादी माहेरी निघून गेली व तिने २० सप्टेंबर २०१७ रोजी पोलीस ठाण्यात संबंधित तक्रार नोंदविली. पती नपुंसक आहे, असा गंभीर आरोपही फिर्यादीने तक्रारीत केला आहे.