घटस्फोटासाठी पत्नीला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 12:34 PM2022-01-17T12:34:44+5:302022-01-17T12:50:57+5:30
न्यायालयाने पत्नीला मनोरुग्ण व क्रूर सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर नसल्याची बाब लक्षात घेता पतीद्वारे घटस्फोटासाठी दाखल अपील फेटाळून लावले.
नागपूर : घटस्फोट मिळविण्यासाठी पत्नीला मनोरुग्ण व क्रूर ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची जोरदार चपराक बसली. न्यायालयाने पत्नीला मनोरुग्ण व क्रूर सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर नसल्याची बाब लक्षात घेता पतीद्वारे घटस्फोटासाठी दाखल अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
प्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी असून, त्यांचे ४ फेब्रुवारी १९९१ रोजी लग्न झाले आहे. पत्नी सुरुवातीपासूनच विचित्र व हिंसक पद्धतीने वागत होती. ती सतत भांडण करीत होती. त्यामुळे कुटुंबातील शांतता भंग झाली होती. दरम्यान, डॉक्टरांनी तिला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाल्याचे सांगितले; पण तिने आजारावरील उपचार पूर्ण केला नाही. तिने गालावर थापड मारल्यामुळे मुलगी बेशुद्ध झाली होती. ती पतीचे केस ओढत होती. त्याची कॉलर पकडत होती. तिने कार्यालयात जाऊन गोंधळ घातला होता. पतीला कार्यालयातून ओढत बाहेर काढले होते.
एक दिवस तिने डास मारण्याची विषारी वडी खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप करण्यात आले होते; परंतु पतीला हे आरोप सिद्ध करता आले नाहीत. सुरुवातीला ७ नोव्हेंबर २००८ रोजी कुटुंब न्यायालयाने पतीची घटस्फोट याचिका खारीज केली होती. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
पत्नीची बाजू ठोस आढळली
उच्च न्यायालयाला पतीपेक्षा पत्नीची बाजू ठोस आढळून आली. पत्नी मुलीच्या भविष्याकरिता संसार करण्यास तयार होती; पण पतीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याशिवाय पत्नी खासगी नोकरी करीत असून, तिच्या मानसिक आजाराविषयी मालकाची काहीच तक्रार नाही, ही बाब हा निर्णय देताना विचारात घेण्यात आली.