तू हैं मेरी किरण’च्या नादात ‘तो’ पोहोचला कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 08:33 PM2022-06-13T20:33:35+5:302022-06-13T20:34:05+5:30
Nagpur News ‘तू हैं मेरी किरण’चा नाद करणे आरोपी तरुणाच्या अंगलट आले. त्याला आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली.
नागपूर : ‘तू हैं मेरी किरण’चा नाद करणे आरोपी तरुणाच्या अंगलट आले. त्याला आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस. आर. त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला. ही घटना महादुला येथील आहे.
शाहरुख शेख फिरोज शेख (२४) असे आरोपीचे नाव असून, तो जय भीमनगर, महादुला येथील रहिवासी आहे. त्याचे पीडित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला त्या मुलीसोबत लग्न करायचे होते; परंतु मुलगी त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास तयार नव्हती. असे असताना आरोपीने तिचा तीन वर्षे पिच्छा केला. त्याने दबाव वाढविण्यासाठी तिला ठार मारण्याची धमकीही दिली. मुलगी त्याला घाबरली नाही. परिणामी, आरोपीचा संयम संपला.
७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १ च्या सुमारास मुलगी पाणी भरण्यासाठी बोअरवेलजवळ एकटीच उभी असताना आरोपी तेथे गेला. त्याने मुलीला पुन्हा लग्नाची मागणी घातली. मुलीने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे आरोपीने चिडून स्वत:जवळचा चाकू बाहेर काढला व मुलीच्या हातावर वार करून तिला जखमी केले. परिणामी, मुलगी वेदनेने ओरडली असता आरोपी अश्लील शिवीगाळ करीत पळून गेला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले. न्यायालयाने पीडित मुलीला पाच हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे.
अशी आहे संपूर्ण शिक्षा
१ - कलम ३५४-डी (१) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
२ - कलम ३२४ अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
३- कलम ५०६ (१) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
४ - कलम २९४ अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.