रेल्वे प्रवाशांशी सौजन्याने वागा : बृजेश कुमार गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:08 PM2018-01-12T22:08:19+5:302018-01-12T22:10:39+5:30
प्रवासात प्रवाशांच्या गरजा, त्यांच्या अडचणी जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास रेल्वेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आपले काम इमानदारीने करून प्रवाशांना सेवा द्यावी असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासात प्रवाशांच्या गरजा, त्यांच्या अडचणी जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास रेल्वेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आपले काम इमानदारीने करून प्रवाशांना सेवा द्यावी असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी केले.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी ‘डीआरएम’कार्यालयाच्या समाधान कक्षात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, प्रवाशांशी संवाद साधताना सौजन्य दाखविण्याची गरज आहे. प्रवाशांना असमाधानकारक सेवा दिल्यास वाद निर्माण होतो. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांनी चांगल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, सहायक कार्मिक अधिकारी मंगेश काशीमकर आणि ५९ तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते.