नागपुरात कोव्हॅक्सिन लस संपली : मेडिकलमध्ये लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:49 AM2021-04-09T00:49:47+5:302021-04-09T00:51:19+5:30
Covacin vaccine vanished कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. यामुळे लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आला. परंतु मागणी एवढा लसीचा पुरवठा न झाल्याने विशेषत: कोव्हॅक्सिन लसीच्या तुडवड्यामुळे गुरुवारी दुपारी १ वाजताच मेडिकलमधील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. यामुळे लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आला. परंतु मागणी एवढा लसीचा पुरवठा न झाल्याने विशेषत: कोव्हॅक्सिन लसीच्या तुडवड्यामुळे गुरुवारी दुपारी १ वाजताच मेडिकलमधील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. सध्या कोविशिल्डचे जवळपास ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. जास्तीत दोन दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने लसीकरणात खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘लोकमत’ने २६ मार्च रोजी ‘कोव्हॅक्सिन लसीच्या तुटवड्याची शक्यता’ व ३१ मार्च रोजी ‘मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा’ बातमी प्रकाशित करून वास्तव मांडले होते.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यात ‘हेल्थ वर्कर’ला प्राधान्य देण्यात आले. १५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण व दुसरा डोस देणे सुरू झाले. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थींचे लसीकरण हाती घेण्यात आले. १ एप्रिलपासून लसीकरणात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आला. यामुळे लसीकरणाचा वेग वाढला. शहरात जवळपास १५ हजारांवर, तर ग्रामीणमध्ये २३ हजारांवर रोज लसीकरण होत आहे. परंतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन आठवड्यापासून कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध झाला नाही. १ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्याला कोविशिल्डचे दाेन लाख ५० हजार ७०० डोस मिळाले. यातील शहरामध्ये केवळ ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. रोज १५ हजारांवर लसीकरण होत असल्याने जास्तीत जास्त दोन दिवसात हा साठा संपण्याची शक्यता आहे.
कोव्हॅक्सिन अभावी सहा केंद्र बंद
शहरातील ८० केंद्रापैकी कोव्हॅक्सिनचे सहा केंद्र होते. मेडिकलमध्ये दोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, विवेका हॉस्पिटल, हंसापुरी आयुर्वेदिक डिस्पेन्सरी व महाल डायग्नोस्टिक सेंटर येथे प्रत्येकी एक केंद्र होते. परंतु शनिवारपासून कोव्हॅक्सिनचा तुटवडा पडल्याने मेडिकल सोडून सर्वच केंद्रांवर कोव्हॅक्सिन देणे बंद झाले. मेडिकलच्या केंद्रावर गुरुवारी केवळ ७० डोस शिल्लक होते. दुपारी १ वाजेपर्यंत डोस संपले. यामुळे त्यानंतर आलेल्या लाभार्थींना परत पाठविण्याची नामुष्की प्रशासनावर आली.
आज येणार कोव्हॅक्सिनचे ५५ हजार डोस
प्राप्त माहितीनुसार, पुणे आरोग्य विभागाच्या कार्यालयातून कोव्हॅक्सिनचे ५५ हजार डोसचा साठा घेऊन नागपूर आरोग्य विभागाची रुग्णवाहिका गुरुवारी निघाली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत रुग्णवाहिका नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे, असे झाल्यास दुपारी १२ वाजेपासून पुन्हा मेडिकलमध्ये लसीकरणाला सुरुवात होईल.
कोविशिल्डचे डोस १५ तारखेनंतरच
सूत्रांनुसार, शहरात जास्तीत जास्त दोन दिवस पुरेल एवढाच कोविशिल्डचा साठा आहे. नवीन साठा १५ एप्रिलनंतर उपलब्ध होणार आहे. यामुळे काही दिवस लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.