अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोलमडली वाहतूक व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:20 PM2018-07-04T23:20:24+5:302018-07-04T23:21:38+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते.
वाहतूक पोलीस नसल्यामुळे शहरातील अनेक चौकात वाहनचालक एकमेकांवर आदळून त्यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा वाहतुक पोलीस विभागाची कुठेच उपस्थिती आढळली नाही. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे बुधवारी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दृष्टीस पडले. अनेक मार्गावर वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी मार्गावर तासन्तास जाम लागला होता. परंतु वाहतुक नियंत्रित करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हता. याशिवाय कॅनाल रोड, रामदासपेठ, रेल्वेस्टेशन रोड, सीए रोड, रामझुला, कामठी रोड, गड्डीगोदाम, सदर, पुनम चेंबर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर जाम लागला होता.
अशी बिघडली व्यवस्था
वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहनचालक आपल्या मर्जीप्रमाणे वाहन चालविताना आढळले. यामुळे चौकाचौकात जाम लागल्याचे दिसले. अनेक मार्गावर तर वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहनचालक डिव्हायडरवरुन जाताना दिसले. यामुळे समस्या आणखीनच वाढली होती.
जाममध्ये अडकली रुग्णवाहिका
रामदासपेठकडे जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रंथालय मार्गावर तासन्तास जाम लागल्याची स्थिती होती. रुग्णाला घेऊन जाणारी एक रुग्णवाहिकाही या जाममध्ये अडकून पडली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात पडल्याचे दिसले. या मार्गाच्या समोरील रस्ता मोकळा होता. परंतु वाहतूक वळविण्यासाठी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्यामुळे वाहनचालक जागेवरच अडकून पडले होते.
शाळकरी विद्यार्थी झाले त्रस्त
कामठी मार्गावर गड्डीगोदामपासून गोळीबार चौकापर्यंत जाम लागल्याची स्थिती होती. या मार्गावरही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस दिसला नाही. या मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. अशा स्थितीत रस्ता आधीच अरुंद झाला असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी अडकून पडले होते.
सदरकडून वाढली वाहतूक
आकाशवाणी चौकाकडून रिझर्व्ह बँक चौकाकडे जाणारा रस्ता बंद होता. त्यामुळे सीताबर्डी आणि सिव्हील लाईन्सकडून येणाऱ्या वाहनचालकांना जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरून सदरकडे जावे लागले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरही जाम लागला होता. सदर परिसरातही वाहतुकीत वाढ झाली होती. सदर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडली.