५ दिवसांआधी कोरोनाची लागण अन् आज आमदार कृष्णा खोपडे आंदोलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 02:23 PM2022-01-18T14:23:31+5:302022-01-18T14:45:33+5:30
५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे आज नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात दिसले. यानंतर आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चांगलेच वादळ उठले आहे. नागपुरात भाजप कार्यकर्ते पटोलेंवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यातच, ५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे(Krishna Khopde) हे देखील आंदोलनात दिसल्याने आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
कोरोनाने देशभरात हाहाकार उडवला आहे. दिवसेंदिवस रुग्णात वाढ होत आहे. सोमवारी एकाच दिवशी ४ जण दगावले असून दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. अशा परिस्थितीत ५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले आमदार खोपडे हे आज आंदोलनात दिसून आले. तर, आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतरच आपण घराबाहेर पडल्याचे स्पष्टीकरण खोपडे यांनी दिले आहे.
आमदार खोपडे हे १३ जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसानंतर आज ते कार्यकर्त्यांसह आंदोलनात दिसून आले. त्यामुळे, कोरोनाचे नियम-निर्बंध हे फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का, की लोकप्रतिनिधींना निर्बंधांचा विसर पडलाय? यांना खरच जनतेची चिंता आहे का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, पटोलेंविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने ठिय्या आंदोलन पुकारले. कोराडी पोलीस ठाणे परिसरात पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केल होत. 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं ते म्हणाले होते. लाखनी तालुक्यातील निवडणूक प्रचारात जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी यांच्याकडून पाटोले यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे.