नागपुरात कोविड-१९ चे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:32 PM2020-04-16T20:32:45+5:302020-04-16T20:33:08+5:30
कोविड-१९ चे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरणाऱ्यां महापालिका कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ चे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरणाऱ्यां महापालिका कर्मचाऱ्यांना दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात घडली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महापालिकेचे कर्मचारी सत्येंद्र चंदनखेडे (४२) आपल्या सहकाऱ्यांसह भानखेडा परिसरात बुधवारी सकाळी ९.३० वाजता कोविड-१९ चे सर्वेक्षण करीत होते. या भागात राहणाऱ्या अब्दुल रफिक याच्या घरी चंदनखेडे आणि त्यांचे सहकारी गेले. त्यांनी सर्वेक्षण सुरू केले असता आरोपी रफिक आणि शफी या दोघांनी चंदनखेडे व त्यांचे सहकारी यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्यावर आरोप लावून त्यांना मारहाणही केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. चंदनखेडे यांनी महापालिकेच्या वरिष्ठांना ही घटना कळविली. त्यानंतर तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी अब्दुल रफिक आणि मोहम्मद शफी या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी रफिकला अटक करण्यात आली असून शफी मात्र फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.