नेल्सन हॉस्पिटलचे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:25+5:302021-05-01T04:07:25+5:30
नागपूर : आज संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. दररोज लाखो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत ...
नागपूर : आज संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. दररोज लाखो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत आणि हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आपले शहर देशातील सर्वाधिक नुकसान झालेल्या शहरांमध्ये आहे. रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन पुरवठा किंवा औषधांच्या उपलब्धतेबाबत वैद्यकीय सुविधा गंभीर तणावाखाली आल्या आहेत. या सर्व अनागोंदीदरम्यान नेल्सन हॉस्पिटलने आपल्या शहरातील बेडची कमतरता दूर करण्यासाठी आणि सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ मेपासून हॉटेल प्राईड, वर्धा रोड येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कोविड केअर सेंटरला मंजुरी देण्यात आली आहे. या सेंटरमध्ये एकूण १२७ खाटांसह ९७ खोल्या राहणार आहेत. डॉक्टरांच्या मते, जर रोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान आणि उपचार केला गेला तर तीव्रता किंवा मृत्यूचे प्रमाण नियंत्रित केले जाऊ शकते. या सेंटरमध्ये एचआरसीटी १० पेक्षा कमी आणि एसपीओ २ (ऑक्सिजन सॅच्युरेशन) ९० पेक्षा जास्त सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना सेवा मिळणार आहे. या सेंटरमध्ये डॉक्टरांची २४ तास उपलब्धता, समर्पित कार्डियाक अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, आवश्यक औषधे, न्यूट्रिशनिस्टद्वारे नियोजित आहार, फिजिओथेरपी व रुग्णांचे समुपदेशन, आदी सुविधा राहणार आहेत. या सेंटरचे उद्घाटन १ मे रोजी दुपारी १२ वाजता मुख्य पाहुणे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका आभासी सोहळ्याच्या माध्यमातून होणार आहे. विशेष अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर टीम ल्यूक कौटिन्हो (भारतातील सेलिब्रिटी हेल्थ गुरू)कडून ‘कोविड काळात आरोग्य आणि निरोगीपणा’ या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण नेल्सन मदर अॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या फेसबुक पेजवर केले जाईल. लोकांना नेल्सन हॉस्पिटलच्या वेबसाईटवर फॉर्म भरून चौकशी करता येणार आहे. (वा.प्र.)