कर्मचाऱ्यांअभावी नागपुरातील कोव्हिड हॉस्पिटल पडलेय धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 01:43 PM2020-09-19T13:43:51+5:302020-09-19T13:45:35+5:30
कोरोनाचा प्रकोप वाढत असताना रुग्णांना खाटा अपुºया पडत आहेत. अशा स्थितीत नागपूर शहरातील तयार असलेले कोव्हिड हॉस्पिटल चक्क धूळ खात पडल्याचे चित्र आहे.
विशाल महाकाळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाकाळात शहराच्या आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी उघडपणे समोर आल्या आहेत. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना रुग्णांना खाटा अपुऱ्या पडत आहेत. अशा स्थितीत शहरातील तयार असलेले कोव्हिड हॉस्पिटल चक्क धूळ खात पडल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावी मनपाने सदर परिसरातील आयुष रुग्णालय रुग्णसेवेसाठी सुरुच केलेले नाही. अधिकारी व लोकप्रतिनिधी एकमेकांकडे बोट दाखवत असून रुग्णांना वाली कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर भागातील आयुष रुग्णालयात ८० खाटांची व्यवस्था करण्यात आली व कोव्हिड हॉस्पिटल म्हणून तैनात करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये खाटादेखील ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापपर्यत रुग्णांना तेथे उपचारच मिळू शकलेला नाही. विशेष म्हणजे काही रुग्ण येथे विचारपूस करण्यासाठीदेखील पोहोचले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.
शहरातील इस्पितळांमध्ये बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. अशा स्थितीत व्यवस्था असूनदेखील एखादे इस्पितळ तयार होऊ शकत नसेल तर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
महापालिका प्रशासनाचे लक्ष नसून केवळ खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यावर भर देण्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी लावला आहे. मनपाच्या इस्पितळात तज्ज्ञ व कर्मचारी नसतील तर त्याची व्यवस्था करायला हवी. मात्र कुठलेही प्रयत्न न करता हॉस्पिटल केवळ नावापुरते सज्ज ठेवणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.