पोलिसांसाठी भक्कम आधार ठरत आहे नागपुरातील कोविड हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:45 AM2020-10-09T10:45:22+5:302020-10-09T10:49:35+5:30
Covid Hospital Nagpur News पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन नागपुरात एकोणीस बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले. पोलिसांसाठी हे हॉस्पिटल भक्कम मानसिक आधार देणारे ठरले आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आणीबाणीच्या वेळी वरिष्ठांची साथ अर्थात भक्कम पाठबळ आणि कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी अत्यावश्यक साधनसुविधा उपलब्ध असली की लढणारा अधिकच जोमाने लढतो. कोरोनाच्या रूपातील राक्षसाविरुद्धची लढाई लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये पोलिसांचे नाव अग्रक्रमाने येते. मात्र याच पोलिसांवर मध्यंतरी कोरोनाने आक्रमण केले होते. त्यामुळे पोलिसांचे मनोबल चांगलेच खालावले. अशा स्थितीत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन नागपुरात एकोणीस बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले. पोलिसांसाठी हे हॉस्पिटल भक्कम मानसिक आधार देणारे ठरले आहे.
अगदी प्रारंभीपासूनच कोरोनाविरुद्ध पोलीस छातीची ढाल बनवून उभे ठाकले. जीवाची पर्वा न करता ते बाधित परिसरात (कंटेन्मेंट झोन) बंदोबस्त करू लागले. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठीही त्यांची धावपळ सुरू होती. पुरेशी काळजी घेतली गेली नसल्यामुळे पोलिसांवर कोरोनाने आक्रमण केले.
पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला. खासगी इस्पितळात त्यांना बेड दिला जात नव्हता. वेळेवर योग्य ते उपचार न मिळाल्याने शहर पोलीस दलातील काही जणांचा मृत्यू झाला. तर कोरोनाची बाधा झालेले अनेक पोलीस आणि त्यांचे नातेवाईक ‘बेड देता का बेड’ म्हणत केविलवाणेपणे इकडे-तिकडे फिरू लागले. ही स्थिती ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत येथील पोलीस मुख्यालयात कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून घेतली. २२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या हॉस्पिटलमध्ये १९ बेडची व्यवस्था आहे. त्यातील आठ आयसीयू तर आठ बेड सेमी आयसीयू आहेत. प्रत्येक बेडला आॅक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, डेफिब्रीलेटर मशीन, तसेच प्रत्येक बेडसमोर टीव्ही आहे. ईसीजी मशीन, डिजिटल एक्स-रे, इको मशीन, अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, पॅथॉलॉजी लॅब, अॅडव्हान्स पल्स काऊंटिंग मशीन आणि अत्याधुनिक केमिकल एनलायझर मशीनचीही या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे. पूर्णत: वातानुकूलित असलेल्या या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक बेड सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे.
आजघडीला येथे गडचिरोली, गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांसह ९ पोलीस आयसीयूमध्ये उपचार घेत असून आतापर्यंत २२ पोलिसांनी येथे उपचार घेऊन कोरोनावर मात केल्याची माहिती इस्पितळाचे प्रमुख डॉ. संदीप शिंदे यांनी दिली आहे.
आयुक्त घेतात अपडेट
संपर्कासाठी येथे पीए सिस्टिम असून पोलिसांच्या परिवारासाठी संपर्काची दैनंदिन व्यवस्था आहे.
रुग्णांसाठी योगा टीचरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी मोटिवेटरचीही व्यवस्था आहे. पोलीस आयुक्त स्वत: रोज सकाळी-सायंकाळी रुग्णांची स्थिती जाणून घेतात.
डॉक्टर, अॅम्ब्युलन्स २४ तास
येथे चार अॅम्ब्युलन्सची सोय आहे. त्यातील दोन अॅम्ब्युलन्समध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. रुग्णांसाठी तसेच तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत मेस सुविधा आहे. येथे हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून डॉ. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात सय्यद तारिक, डॉ. कुंतलेश्वर जांभूळकर आणि डॉ. प्रवीण गावंडे सेवारत आहेत. त्यांच्या मदतीला १६ परिचारिका, ६ वॉर्ड बॉय आणि चार स्वच्छता कर्मचाºयांची सुविधा आहे. या सर्वांसाठी परिसरातच निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.