नागपुरात कोविड पॉझिटिव्ह कॅन्सर रुग्णाचा मृत्यू : मृतांची संख्या आठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:25 PM2020-05-25T23:25:08+5:302020-05-25T23:28:11+5:30

एका महिला कॅन्सर रुग्णाचा मेयो रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा आज नमुना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या मृत्यूसह मृतांची संख्या आठवर पोहचली आहे.

Covid positive cancer patient dies in Nagpur: Death toll rises to eight | नागपुरात कोविड पॉझिटिव्ह कॅन्सर रुग्णाचा मृत्यू : मृतांची संख्या आठ

नागपुरात कोविड पॉझिटिव्ह कॅन्सर रुग्णाचा मृत्यू : मृतांची संख्या आठ

Next
ठळक मुद्देगर्भवती, एसआरपीएफच्या जवानासह पाच पॉझिटिव्ह : सिरसपेठ, हिवरीनगरात रुग्णाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका महिला कॅन्सर रुग्णाचा मेयो रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा आज नमुना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या मृत्यूसह मृतांची संख्या आठवर पोहचली आहे. सोमवारी गर्भवती, एसआरपीएफच्या जवानासह पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, सिरसपेठ व हिवरीनगर या नव्या वसाहतीतही रुग्णाची नोंद झाली. हे दोन्ही रुग्ण मुंबई येथून आले आहेत. नागपुरात रुग्णांची संख्या ४२८ झाली आहे. या शिवाय, आज १५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
नागपुरात रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. गेल्या तीन दिवसांत १७ च्या आत रुग्णांची संख्या आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. मेयोत आज मृत्यूची नोंद झालेली रुग्ण ही मोमिनपुऱ्यातील रहिवासी आहे. ५० वर्षीय महिला गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाची रुग्ण होती. रविवारी तिच्या नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत मेयोत दाखल केले. तिला न्युमोनियासारखी लक्षणे असल्याने ‘सारी’च्या वॉर्डात भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर काही मिनिटांतच तिचा कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे नागपुरात आणखी एका मृत्यूची नोंद झाली.

दोन पोलीस, आठ जवान पॉझिटिव्ह
नागपुरात पहिल्यांदाच १६ मे रोजी दोन पोलीस व एक एसआरपीएफचा जवान पॉझिटिव्ह आले. त्यानंतर २० मे रोजी पुन्हा एसआरपीएफचे सहा जवानांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले तर पाच दिवसांत पुन्हा एक ४० वर्षीय जवान पॉझिटिव्ह आला. लकडगंज ठाण्याअंतर्गत हा जवान तैनात होता. आतापर्यंत दोन पोलीस व आठ जवानाना कोरोनाची लागण झाली आहे. यातील तिघांना रुग्णालयातून सुटी मिळली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवतीवर मेयोत उपचार
मोमिनपुरा येथून कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. येथील एका गर्भवतीचा नमुना तपासला असता ती पॉझिटिव्ह आली. आतापर्यंत या वसाहतीतून दहावर गर्भवती पॉझिटिव्ह आल्या आहेत. या महिलेला उपचारासाठी मेयोत दाखल करण्यात आले आहे.

हिवरीनगरातील १६ लोकांना क्वारंटार्ईन
हिवरीनगर येथील २४ वर्षीय तरुणी मुंबई येथून नागपुरात २२ मे रोजी आली. तिने हा प्रवास कारने केला. २३ मे रोजी तिला ताप व इतर लक्षणे दिसून आली. खासगी इस्पितळात गेल्यावर तेथील डॉक्टरांनी कोविड-१९ तपासणी करण्यास सांगितले. खासगी लॅबमध्ये नमुने दिल्यावर आज अहवाल पॉझिटिव्ह आला. तरुणीला मेडिकलमध्ये दाखल केले आहे. तरुणीच्या घरच्यांसह १६ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे, या तरुणीसह तिच्यासोबत तिची मैत्रीण मुंबईवरून नागपुरात आली. परंतु अद्याप तिची माहिती समोर आली नाही. सिरसपेठ येथील एक महिला मुंबईवरून नागपुरात उपचारासाठी आली असताना तिचा नमुनाही खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे. या वसाहतीतील १५ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दोन्ही रुग्ण नव्या वसाहतीतील आहेत. परिणामी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मेयोमधून १५ रुग्णांना डिस्चार्ज
मेयोमधून आज १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात सात पुरुष व सहा महिला व दोन लहान मुले आहेत. हे सर्व मोमिनपुरा येथील रहिवासी आहेत. ईदच्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्यास मिळाल्याने त्यांनी डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. नागपुरात आतापर्यंत ३५५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १०२
दैनिक तपासणी नमुने २५९
दैनिक निगेटिव्ह नमुने २५६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४२८
नागपुरातील मृत्यू ०८
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३५५
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,४४३
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,७५४
पीडित-४२८-दुरुस्त-३५५-मृत्यू-८

Web Title: Covid positive cancer patient dies in Nagpur: Death toll rises to eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.