आता प्रत्येक झोनमध्ये फिरते कोविड चाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 08:04 PM2020-09-30T20:04:34+5:302020-09-30T20:05:49+5:30
नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या आपली बसच्या ढाच्यामध्ये किरकोळ परिवर्तन करून त्या बसेस फिरते कोविड चाचणी केंद्र म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. अशा १२ बसेस सध्या सज्ज झाल्या आहेत.
महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी हिरवी झेंडी दाखवून या बसला रवाना केले. अनेक लोक काही आजार, वृद्धापकाळ किंवा अन्य कारणाने चाचणी केंद्रावर चाचणीसाठी जाऊ शकत नाही अशांसाठी या कोविड चाचणी बसेस फायदेशीर ठरणार आहेत. शहरातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची लक्षणे लपवू नयेत, त्यांची वेळीच चाचणी होऊन उपचार सुरू व्हावेत यादृष्टीने हा पुढाकार घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असून त्यात एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्याची त्वरित चाचणी करण्यास या बसेस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक बस उपलब्ध असून स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने चाचणी केली जाईल. शहर बसचा उपयोग कोविड चाचणी केंद्रासाठी करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
मनपाकडे आधी दोन फिरते चाचणी केंद्र होते. आता परिवहन विभागाच्या सहकार्याने यामध्ये १२ केंद्रांची भर पडली आहे.
बसमधून एकावेळी दोघांची चाचणी
आपली बसमध्ये परिवर्तन करून तयार करण्यात आलेल्या कोविड चाचणी केंद्रामधून एकावेळी दोन जणांची चाचणी केली जाणार आहे. यासाठी बसमध्ये दोन डॉक्टर, एक नर्स आणि एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बसमधून रुग्ण आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष संपर्क न येता चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसमध्ये मुख्यत: आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.