पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 02:39 PM2022-01-02T14:39:06+5:302022-01-02T14:58:04+5:30

नागपूर महानगरपालिका 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीकोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ७ केंद्रांवर व्यवस्था केली आहे आणि विनंतीनुसार महापालिकेच्या शाळांमध्येही व्यवस्था केली जाईल.

covid vaccination available from 3rd january for 15 to 18 age group in nagpur | पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

Next
ठळक मुद्देसात केंद्रांवर व्यवस्था १८ वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण नियमित सुरू

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असताना उद्या सोमवारपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जवळपास २ लाख ४८ हजार २६६ मुलांना लस दिली जाणार आहे.

-लसीकरणासाठी शाळा, महाविद्यालयांची मदत

कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षेसाठी होणाऱ्या लसीकरणाचा वयोगट विद्यार्थ्यांचा असल्याने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी मनपाद्वारे शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांचीही मदत घेतली जाणार आहे. या संदर्भात संबंधित प्रतिनिधींसोबत चर्चा झाली असून ते मनपाला सहकार्य करणार आहेत.

-३१ डिसेंबर २००७ पूर्वी जन्मलेले लसीकरणास पात्र

मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था शहरात सात केंद्रांवर करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लस दिली जाईल. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येईल. २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल. ३१ डिसेंबर २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले लसीकरणासाठी पात्र असतील असे महापौरांनी म्हटले आहे.

-ग्रामीणमधील मोठ्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले, ग्रामीणमध्येही १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून होणार आहे. यात लसीकरणासाठी त्या त्या गावातील मोठ्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात याची सोय करण्यात आली आहे.

-विनंतीनुसार शाळांमध्ये लसीकरण

मनपाकडे येणाऱ्या विनंतीनुसार त्या त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण नियमित सुरू राहील. लसीकरणासाठी पात्र नागपूर शहरातील सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीने पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

-पालकांच्या संमतीने लसीकरण

शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शिबिर आयोजित करायचे असल्यास त्यांनी मनपाला माहिती द्यावी. पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

-राधाकृष्णन बी., आयुक्त मनपा

शहरात या ठिकाणी मिळणार लस

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, मिलान नागपूर (एम्स)
  • मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
  • प्रगती सभागृह, दिघोरी
  • मनपाचे आयसोलेशन हॉस्पीटल, जाटतरोडी
  • मध्य रेल्वे रुग्णालय
  • डॉ. आंबेडकर, कामठी रोड

Web Title: covid vaccination available from 3rd january for 15 to 18 age group in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.