कोविड लसीमुळे चुंबकीय शक्ती निर्माण होणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:22+5:302021-06-17T04:07:22+5:30
जलालखेडा: कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याची अफवा समाजात पसरत आहे. शरीराला स्टील चमचे, ताट, ...
जलालखेडा: कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याची अफवा समाजात पसरत आहे. शरीराला स्टील चमचे, ताट, वाटी चिकटतात असा करण्यात आलेला दावा फोल आहे. कोरोना संकटात समाजात अंधश्रद्धा पसरू नका असे आवाहन शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे यांनी केले आहे.
कोविड प्रतिबंधात्मक लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व कोरोनाला आळा बसतो. त्या लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही. असे असते तर कोविड लस घेतलेल्या प्रत्येकाच्या शरीरात चुंबकीय तत्व निर्माण झाले असते. आपल्या शरीरातून घाम येतो. तो घाम शरीरावर चिकटतो. या घामामध्ये ‘सिबम’ हा चिकट द्राव असतो. हा ‘सिबम’ चिकट असल्यामुळे त्वचेवर चिकटपणा निर्माण होतो. त्या घामामुळे केवळ धातूंच्याच नव्हे तर प्लास्टिकच्या वस्तू चिकटतात. ज्या व्यक्तीच्या त्वचेवर ‘सिबम’ चिकटलेला असतो त्या व्यक्तीच्या शरीरावर या वस्तू चिकटतात. शरीर स्वच्छ पाण्याने किंवा साबणाने धुतले तर ‘सिबम’ द्राव नष्ट होतो व वस्तू चिकटत नाही.
--
तुमच्या परिसरात कुणी कोविड लसीमुळे चुंबकीय तत्व निर्माण झाल्याचा दावा करीत असेल तर त्या व्यक्तीच्या त्वचेवर पावडर लावा व वस्तू चिकटविण्यास सांगा. जमिनीवर पडलेला चमचा चुंबकीय शक्तीने उचलून देण्याचे आवाहन करा.
राजेंद्र काकडे, शिक्षक