कोविड व्हेरियंट JN-1 वाढतोय, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य यंत्रणा अलर्ट!

By जितेंद्र ढवळे | Published: December 20, 2023 09:16 PM2023-12-20T21:16:36+5:302023-12-20T21:16:57+5:30

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

Covid variant JN-1 is on the rise, but there is no reason to panic! | कोविड व्हेरियंट JN-1 वाढतोय, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य यंत्रणा अलर्ट!

कोविड व्हेरियंट JN-1 वाढतोय, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य यंत्रणा अलर्ट!

जितेंद्र ढवळे, नागपूर: कोविड जेएन-१ या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी येथे सांगितले.

कोविड -१९ च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन-१ या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले. जेएन-१ या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. जेएन-१ व्हेरियंट झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात ३.३ टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण सध्या २७.१ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

देशात १९ डिसेंबरपर्यंत २ हजार ३११ रुग्ण आढळले असून केरळमध्ये २ हजार ४१ रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यामध्ये १५ रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडू १४ तर महाराष्ट्रामध्ये ११ रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्रिसूत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Covid variant JN-1 is on the rise, but there is no reason to panic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.