अज्ञात वस्तूचा तोंडात स्फोट झाल्याने गाईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 09:41 PM2022-12-20T21:41:39+5:302022-12-20T21:42:15+5:30
Nagpur News चरताना अज्ञात वस्तूचा तोंडात स्फोट झाल्याने गाईचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेणे सुरू आहे.
नागपूर : चरताना अज्ञात वस्तूचा तोंडात स्फोट झाल्याने गाईचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेणे सुरू आहे.
शिवणगाव येथील जुन्या वस्तीत सुनील हिवसे (५५) हे राहतात व त्यांच्याकडे १० हून अधिक गाई आहेत. त्यांचा मुलगा हर्षल हा गाई घेऊन सीआरपीएफच्या भिंतीजवळील नाल्याच्या परिसरात गेला होता. लाल रंगाची एक गाय चरत असताना अचानक तिच्या तोंडात कुठल्या तरी वस्तूचा स्फोट झाला व तिचा जबडा फाटला. हिवसे यांनी गाईला कसेबसे घरी आणले. मात्र, तिचा मृत्यू झाला. त्यांनी तिला घरीच मातीमध्ये गाडले व त्याची माहिती पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या परिसरात डुकरांना मारण्यासाठी स्फोटकसदृश वस्तू ठेवण्यात येतात. त्यातीलच कशाचा गाईच्या तोंडात स्फोट झाल्याची शक्यता आहे.