अमानुषपणा! साडेतीन तास जखमेने विव्हळत राहिली गाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 03:33 PM2021-12-16T15:33:36+5:302021-12-16T15:44:32+5:30

हिंगणा राेडवर कारच्या धडकेने जखमी झालेली एक गाय तब्बल साडेतीन तास जखमेने विव्हळत राहिली. तिच्या पायातून भळभळ रक्त वाहत हाेते; पण येथे पाेहोचलेल्या पाेलिसांनी मानवीयता दाखविली ना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने तिला उपचार देण्याचा प्रयत्न केला.

a cow seriously injured in a car accident in nagpur | अमानुषपणा! साडेतीन तास जखमेने विव्हळत राहिली गाय

अमानुषपणा! साडेतीन तास जखमेने विव्हळत राहिली गाय

Next
ठळक मुद्देएका महिलेच्या कारने माेडला पाय मनपा, पाेलिसांचा हलगर्जीपणाचा कळस

नागपूर : प्राणीमात्रांवर दया करावी असे आपणास नेहमीच शिकवले जाते. मुक्या प्राण्यांनाही जीव आहे, मात्र, काही क्रूर माणसांना मुक्या प्राण्यांची दया येत नाही. नागपुरात हिंगणा राेडवरील लाेकमान्यनगर मेट्राे स्टेशनच्या थाेडे समाेर बुधवारी एक विदारक दृश्य अनेकांनी अनुभवले.

एका कारच्या धडकेने गंभीर जखमी झालेली एक गाय तब्बल साडेतीन तास या ठिकाणी जखमेने विव्हळत राहिली. तिच्या पायातून भळभळ रक्त वाहत हाेते; पण येथे पाेहोचलेल्या पाेलिसांनी मानवीयता दाखविली ना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने तिला उपचार देण्याचा प्रयत्न केला. या गायीच्या उपचारासाठी, वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणीने साडेतीन तास चाललेला हा ससेमिरा सांगितला.

दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडलेली ही घटना. मिळालेल्या माहितीनुसार एका कारचालक महिलेने रस्त्यावर बसलेल्या या गायीला हाॅर्न देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बाजूला झाली नाही. या रागाने कार तिच्या पायावरून नेल्याचे काहींनी सांगितले. याच रस्त्याने प्राणिमित्र साक्षी हिंगण्याकडून नागपूरला येत हाेती. तिने गाडी थांबविली आणि कुणाकडून तरी नंबर मिळवून मनपाच्या पशू अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा साक्षीने आसपासच्या नागरिकांना गाेळा केले आणि गायीला रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माेडलेल्या पायातून माेठ्या प्रमाणात रक्तस्राव हाेत हाेते. यादरम्यान जवळच असलेले पाेलीसही घटनास्थळी पाेहोचले. त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले; पण काही फायदा झाला नाही. ‘गर्दी करू नका’, एवढे बाेलून ते निघून गेले.

या काळात साक्षी पशू अधिकाऱ्यांना १०-१२ फाेन लावून चुकली हाेती. दुसऱ्या एका व्यक्तीकडूनसुद्धा फाेन लावला; पण प्रतिसाद नाही. कदाचित ते महत्त्वाच्या बैठकीत असतील. लाेकांच्या मदतीने ओढतच गायीला रस्त्याच्या कडेला नेले. किमान गायीचे रक्त थांबावे म्हणून साक्षीने जवळच्या दुकानातून हळद आणली आणि साेबतच्या कपड्याने पाय बांधला. एका खासगी डाॅक्टरांशी बाेलून त्यांना उपचारासाठी यायची विनंती केली. एवढ्यात तीन-साडेतीन तास निघून गेले. तेव्हा कुठे मनपाची प्राणी पकडणारी गाडी आली. तेव्हा या जखमी गायीला धंताेलीच्या गाेरक्षण येथे नेण्यात आले. मात्र, गायीच्या जिवासाठी साडेतीन तास चाललेली धडपड साक्षीला मनस्ताप देणारी ठरली.

सेव्ह स्पीचलेसच्या स्मिता मिरे यांनी सांगितले की, प्राण्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कायमच हा मनस्ताप सहन करावा लागताे. मनपा व पाेलिसांकडून सहकार्य मिळण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागताे. गायीचा अजेंडा चालविणाऱ्या भाजपची महापालिकेत सत्ता आहे; पण त्या गायीला वाचविण्यासाठी असा मनस्ताप हाेत असेल तर काय म्हणावे.

Web Title: a cow seriously injured in a car accident in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.