गुराख्याचा संप अन् अख्खे गाव चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:08 PM2018-05-12T23:08:46+5:302018-05-12T23:09:15+5:30
रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले आहे. परिणामी, पाच दिवसांपासून ही गुरे गोठ्यातच बांधून आहेत. हा प्रकार टेंभूरडोह (ता. सावनेर) येथे नुकताच घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले आहे. परिणामी, पाच दिवसांपासून ही गुरे गोठ्यातच बांधून आहेत. हा प्रकार टेंभूरडोह (ता. सावनेर) येथे नुकताच घडला.
मोतीराम वाघाडे आणि त्याची पत्नी रेखा वाघाडे, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर हे गावातील शेतकऱ्यांची गुरे रोज चारायला नेतात. त्यावर त्यांची उपजीविका चालते. तो सर्व गुरे सकाळी चारायला नेण्यापूर्वी गावालगतच्या वडाच्या झाडाखाली गोळा करतो. गावाजवळ जंगल नसल्याने तो ही सर्व गुरे शिवारात व पांदण रस्त्याच्या कडेला चारतो आणि रात्री परत आणतो.
अमर तांडेकर (३१) हा गेल्या दीड महिन्यांपासून पांदण रस्त्याने ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करीत आहे.
जनावरांमुळे त्याच्या रेतीवाहतुकीला अडसर निर्माण होत असून, अनेकदा त्याचे रेतीचे ट्रक अडकून पडले. त्यामुळे अमरने वाघाडे दाम्पत्याला पांदण रस्त्याच्या कडेला गुरे चारण्यास व कन्हान नदीवर पाणी पाजायला आणण्यास मनाई करत धमकावणे सुरू केले. वाघाडे दाम्पत्य जुमानत नसल्याचे लक्षात येताच अमरने त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मोतीराम वाघाडे यांनी खापा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तपासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाघाडे दाम्पत्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले. परिणामी, पाच दिवसांपासून शेतकऱ्यांना त्यांची गुरे गोठ्यातच बांधून ठेवावी लागत असून, तिथेच चारापाणी करावा लागत आहे. त्यामुळे रेतीवाहतूकदारावर कारवाई करून ही समस्या सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.