रेल्वेस्थानकावर गाई, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:27+5:302021-08-28T04:11:27+5:30
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर गाई आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवाशांना ही कुत्री चावा घेण्याची शक्यता असून रेल्वे ...
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर गाई आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवाशांना ही कुत्री चावा घेण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनाने या गाई, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वेगाड्यांची संख्याही वाढली आहे. परंतु रेल्वेस्थानकावर प्रवासी सुरक्षित नसल्याची स्थिती आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. प्लॅटफॉर्मवर गाडी येण्यापूर्वी शेकडो प्रवासी गाडीत चढण्यासाठी उभे असतात. त्यामुळे गाडीत चढताना चुकीने एखाद्या प्रवाशाचा पाय या मोकाट कुत्र्यावर पडल्यास ते प्रवाशांना चावा घेण्याची दाट शक्यता आहे. परंतु मोकाट कुत्री डोळ्याने दिसूनसुद्धा रेल्वेचे अधिकारी त्यांचा बंदोबस्त करताना दिसत नाहीत. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी एखाद्या प्रवाशाला कुत्र्याने चावा घेण्याची वाट पाहत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शुक्रवारी तर एक गाय पश्चिमेकडील आरक्षण कार्यालयात फिरताना दिसली. बराच वेळ ही गाय आरक्षण कार्यालयात ठाण मांडून बसली होती. परंतु आरक्षण कार्यालयातील एकाही कर्मचाऱ्याने या गाईला बाहेर काढण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने गाई, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
.......