Corona Virus in Nagpur; नाकाबंदी करीत उपराजधानीत ‘सीपी’ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 09:13 PM2020-04-07T21:13:10+5:302020-04-07T21:13:56+5:30
पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरातील सीमावर्ती भागातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पाहणी केली आणि कडक बंदोबस्ताच्या सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील काही भागात गस्त वाढविली आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागातही पहारा वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरातील सीमावर्ती भागातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पाहणी केली आणि कडक बंदोबस्ताच्या सूचना केल्या.
सोमवारी नागपुरात एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण नव्याने उघडकीस आल्याने आणि सतरंजीपुरा भागातील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाने आता विशेष दक्षता घेणे सुरू केले आहे. लॉकडाऊन झाल्यापासूनच शहरातील सर्व चौकांमध्ये आणि सीमावर्ती भागातील मार्गावरील सर्व मुख्य पोलिसांचा २४ तास पहारा आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलीस विभागानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गरीब नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचे नियोजन सामाजिक संघटनांच्या माध्यमतून केले आहे.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपाध्याय यांनी मंगळवारी दुपारी काटोल रोड, कामठी नाका परिसरातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पहाणी केली. स्वत: चौकात उभे राहून बंदोबस्ताचा आढावाही घेतला. बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी व्हेरायटी चौक, सीताबर्डी चौकात जाऊन पहाणी केली. शहरातील मुख्य चौक असलेल्या बहुतेक ठिकाणी उपाध्याय यांनी आज भेटी दिल्या आणि आढावा घेऊन त्यातील त्रुटी जाणून घेतल्या.
दरम्यान, वाठोडा येथे मंगळवारी दुपारनंतर पोलिसांनी पथसंचालन केले. लॉकडाऊन सुरू असल्याने आणि संचारबंदी कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना यावेळी पोलिसांनी परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून केल्या. सतरंजीपुरा भागातही गस्त आणि पहारा वाढविला आहे. या परिसरातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने महानगरपालिका, पोलीस विभाग आणि प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. या परिसरातील नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
शहरातील काही भागात दोन दिवसापासूनच पोलिसांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नाकाबंदी केली आहे. मंगळवारीही ती कायम होती. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरात फिरून या सर्व परिस्थितीची पहाणी केली, काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या.