नागपुरातील ७० लाखांच्या लुटमारीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:28 AM2018-07-06T00:28:36+5:302018-07-06T00:29:20+5:30
कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या लुटारूंचा छडा लावण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी यश मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या लुटारूंचा छडा लावण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी यश मिळाले.
विदर्भातील मोठा कोळसा व्यापारी म्हणून कैलास अग्रवाल यांचे नाव आहे. सदरमधील छावणी परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. ते आणि त्यांचे बंधू दिलीप अग्रवाल यांचे भंडारा मार्गावरील पॉवर हाऊस चौकात शिवम् टॉवरमध्ये डी. के. अॅन्ड कंपनी तसेच आयाती मिनरल्स नावाने कार्यालय आहे. दुसºया माळ्यावरील या कार्यालयातून २९ जूनच्या रात्री ८.१० वाजता कैलास अग्रवाल यांचा मुलगा सचिन तसेच रोखपाल राजेश भिसीकर सुमारे ७० लाखांची रोकड घेऊन घरी जाण्यासाठी निघाले होते. राजेशच्या हातात नोटांनी भरलेली बॅग होती. ते कारकडे जात असताना अचानक समोर आलेल्या लुटारूंनी सचिन आणि राजेशच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि राजेशपासून नोटांनी भरलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. राजेशने बॅग घट्ट पकडून ठेवल्यामुळे लुटारूंनी प्रारंभी पिस्तुलाचा धाक दाखवला. त्याला मानत नसल्याचे पाहून लुटारूंनी धारदार शस्त्राने राजेशच्या हातावर घाव मारले आणि नोटांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढला. या धाडसी लुटमारीचा लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल झाला होता. लकडगंज तसेच परिमंडळ तीन मधील सहा पोलीस पथके आणि गुन्हे शाखेची सहा पथके या लुटमारीचा समांतर तपास करीत होती. तब्बल सातव्या दिवशी, गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाला या लुटमारीतील आरोपीचा छडा लावण्यात यश मिळाले. वृत्त लिहिस्तोवर सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त करण्यात आली. अन्य काही आरोपींचा पोलीस शोध घेत होते.