अनधिकृत वेंडरविरुद्ध कारवाईची धडक मोहिम, पाच जणांना अटक; अनधिकृत खाद्यपदार्थ आणि शितपेय जप्त
By नरेश डोंगरे | Published: May 7, 2024 09:25 PM2024-05-07T21:25:10+5:302024-05-07T21:25:35+5:30
बल्लार शाह रेल्वे स्थानकावर तयार झालेल्या आणि पुढे नागपूरसह वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या गेलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे.
नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्य पदार्थ, पेयजल विकणाऱ्यांविरुद्ध मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाईची मोहिम सुरू केली. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुरंतो एक्सप्रेसमध्ये पाच अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पकडण्यात आले.
बल्लार शाह रेल्वे स्थानकावर तयार झालेल्या आणि पुढे नागपूरसह वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या गेलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. कुणीही याव आणि काहीही विकावं, असा प्रकार सुरू असल्याने आणि त्या संबंधाने मोठी ओरड झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी कॅटरिंगवाल्यांशी लाडीगोडी करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. अनधिकृत आणि दर्जाहिन खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या आठवड्यापासून ठिकठिकाणी कारवाईची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनात सहायक व्यवस्थापक रईस हुसेन यांनी सोमवारी तीन मुख्य वाणिज्य निरीक्षक, दोन आरपीएफचे जवान सोबत घेतले.
कारवाई कोणत्या गाडीत वा कोणत्या स्थानकावर केली जाणार, याबाबत कुणालाही माहिती न देता नागपूरहून दुरंतो एक्सप्रेस रवाना होताच हे पथक खापरी स्थानकावर पोहचले. त्यांनी दुरंतो एक्सप्रेस थांबवून या गाडीच्या विविध डब्यांमध्ये खाद्यपदार्थ विकणारे, ज्यूस तसेच पेयजल विकणाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यात पाच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते या पथकाच्या हाती लागले. ते सर्व रेल्वेत विकण्याची परवानगी नसलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ, अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेये आणि चहा, कॉफी विकत होते. या विक्रेत्यांना वर्धा स्थानकावर उतरवून त्यांना तसेच त्यांच्याकडून जप्त केलेले पदार्थ आणि बनावट कागदपत्रे आरपीएफकडे सोपविण्यात आले.
गणवेष अन् आयकार्डही बोगस
पकडण्यात आलेले हे भामटे आयआरसीटीसीने जारी केलेल्या गणवेषासारखा बनावट गणवेष, बनावट आयकार्ड घालून रेल्वे गाड्यांमध्ये हा गोरखधंदा करीत होते. विशेष म्हणजे, एकीकडे ही कारवाई सुरू असताना अशा प्रकारची बनवाबनवी अनेक रेल्वेगाड्यांत सुरू असल्याची तक्रार सोमवारी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
वर्धा स्थानकावरही कारवाई
वर्धा रेल्वे स्थानकावरही याच पथकाने खाद्यपदार्थ, पाणी विक्रेत्यांची तपासणी करून परवानगी नसलेले पदार्थ तसेच रेल नीर व्यतिरिक्त विकल्या जाणाऱ्या दुसऱ्या पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या. यावेळी दोन अनधिकृत ट्रॉलीही जप्त करण्यात आल्या.