फटाक्यांमुळे नागपुरात ११ ठिकाणी आग लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 11:14 PM2018-11-08T23:14:57+5:302018-11-08T23:17:47+5:30

दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सामानाला मोठी आग लागली. यासह फटाक्यामुळे शहरात विविध ११ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविल्याने कोटवधीची हानी टळली. तसेच गेल्या दोन दिवसात शहरात ठिकठिकाणी आगीच्या लहानमोठ्या अन्य नऊ घटना घडल्या.

Crackers caused fire in 11 places in Nagpur | फटाक्यांमुळे नागपुरात ११ ठिकाणी आग लागली

फटाक्यांमुळे नागपुरात ११ ठिकाणी आग लागली

googlenewsNext
ठळक मुद्देअग्निशमन विभागाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली : दोन दिवसात लहानमोठ्या आगीच्या २० घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सामानाला मोठी आग लागली. यासह फटाक्यामुळे शहरात विविध ११ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविल्याने कोटवधीची हानी टळली. तसेच गेल्या दोन दिवसात शहरात ठिकठिकाणी आगीच्या लहानमोठ्या अन्य नऊ घटना घडल्या. 


डागा ले-आऊट कॉर्पोरेशन कॉलनीतील स्केटिंग ग्राऊंडला लागून प्रशासकीय कार्यालय होते. कालांतराने नागपूर सुधार प्रन्यासने सदर जागा रेस्टारंटकरिता दिली. रेस्टॉरंट मालकाने तेथे बांबूचे आणि ताटव्यांचे बांधकाम केले. डागा नगर नागरिक मंडळाने त्याला विरोध केला. त्याबाबत तक्रारी दिल्या. तक्रारीवरून नासुप्रने ते बांधकाम पाडले. मात्र, रेस्टॉरंट मालकाने ते सामान तेथेच साठवून ठेवले. बुधवारी रात्रीच्या सुमारास या सामानाला फटाक्यांमुळे आग लागली. बाजूलाच असलेले डागानगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना केली. लगेच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविले. जरा उशीर झाला असता तर संपूर्ण डागानगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते, असे चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसात फटाक्यामुळे कचऱ्याला आग लागल्याच्या ११ घटना घडल्या. यात व्यंकटेश मंदिर देवाडियाजवळ कचऱ्याला आग लागली. लकडगंज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. अभ्यंकरनगर व्हीएनआयटी चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, जरीपटका पोलीस ठाण्यासमोरील वैभवनगर येथील कचरा, व्हेरायटी चौकात गेसन्ससमोरील कचरा, गुरुदेव नगरातील राजीव गांधी सभागृहासमोरील कचऱ्याला लागलेली आग, वर्धमान नगरातील रेसीडेन्स हॉस्पीटलसमोरील कचरा आग, छोटा ताजबाग एम्पायर बारजवळ कचरा, गांधीबाग पोलीस क्वॉर्टरजवळील वाहतूक सिग्नलजवळील कचरा, मोतीबाग पाचपावली रेल्वे गेटजवळील कचरा, गीतांजली टॉकीजजवळील कचरा, तसेच गोरेवाडा वॉटर फिल्टर प्लान्टजवळ कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडल्या. या सर्व आगीवर अग्निशमन विभागाच्या जवानांनी यशस्वीरीत्या नियंत्रण मिळविण्यात आले.
तसेच अन्य घटनांमध्येही अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले. धरमपेठ ट्राफिक पार्क वाय पॉर्इंटजवळ सिलेंडरला आग लागून २५ हजारांचे नुकसान झाले. त्यावरही अग्निशमन विभागाने तत्परतेने नियंत्रण मिळविले. क्रीडा चौकात पकोड्याच्या ठेल्याला आग लागली. त्यावरही नियंत्रण मिळविण्यात यश आले. , सदर छावणी मशीदजवळ घराला लागलेली आग, पांडे ले-आऊटमधील प्रणव ३ अपार्टमेंटमध्ये दिव्यामुळे लागलेली आग, वंजारीनगर येथे भंगार आॅटोला आग लागली. अग्निशमन विभागाने मनुष्यबळाचा अभाव असतानाही योग्य नियोजन केले. कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या. प्रशिक्षणार्थींनाही अग्निशमन केंद्रावर तैनात ठेवले. कार्यालयीन लिपिकांच्याही रजा रद्द करीत रात्रपाळीत कामावर बोलाविले. योग्य नियोजनामुळेच घटना घडताच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्तव्य बजावत शहरातील आगीमुळे होणारी हानी टाळण्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

हॉस्पिटलमधील रुग्ण थोडक्यात बचावले
सुभाषनगर रोड केळकर मानव हॉस्पीटल येथे पहिल्या माळ्यावर आग लागली. येथील १२ पुरुष आणि दोन महिलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यां
ना यश आल्याने रुग्ण थोडक्यात बचावले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुमारे २५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान टळले.

दक्षता हाच आग नियंत्रणावर उपाय : महापौर
दिवाळीच्या दिवसांत आगीच्या घटना घडत असतात. मात्र, याबाबत मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे वेळोवळी जनजागृती करण्यात आली. दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. यामुळेच यंदाच्या दिवाळीत तुरळक घटना वगळता कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. तत्परता दाखविणारे अग्निशमन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि वेळीच विभागाला सूचना देणारे चंद्रपाल चौकसे यांच्यासारखे दक्ष नागरिक यांच्यामुळेच सुदैवाने दुर्घटना घडलेली नाही. या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Web Title: Crackers caused fire in 11 places in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.