यंदाची नागपुरातील फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:17 PM2018-11-10T21:17:14+5:302018-11-10T21:20:08+5:30
दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
विक्रेत्यांना परवाना मिळण्यास उशीर
पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे फटाका विक्रीत घट होण्याची शक्यता प्रारंभी वर्तविली जात होती. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी ग्राहक बाजारात फिरकले नव्हते. पण लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांपूर्वी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. पोलिसांनीही दिवाळीच्या काहीच दिवसांपूर्वी फटाके विक्रीला परवाना दिल्यामुळे अनेकांना दुकाने थाटण्यात अडचणी आल्या. किरकोळ विक्रेत्यांना परवाना मिळाल्यानंतरच ठोक खरेदीला प्रारंभ केला. रेशीमबाग, तुळशीबाग येथील फटाके विक्रेते सय्यदभाई म्हणाले, परवाना उशिरा मिळाला तरीही फटाके विक्रीवर काहीही परिणाम झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली.
कच्चा माल महागला
फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्चा मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टीच्या कि मतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च या सर्व बाबींमुळे फटाके उत्पादकांना फटाक्यांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता, असे उत्पादक ललित कारटवटकर यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अन् पर्यावरण प्रेमींची जनजागृती
वाढत्या प्रदूषणाचे कारण देत रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश आणि पर्यावरण प्रेमींच्या जनजागृतीचा परिणाम विक्रीवर झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. फटाक्यांमध्ये अनार, सुतळी बॉम्ब, चक्री, फुलझडी यांची सर्वाधिक विक्री होते. यंदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी नागरिकांनी फॅन्सी, विना आवाजाचे, रंगांची उधळण करणाऱ्या कमी आवाजाच्या फटाक्यांना प्राधान्य दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून उत्पादक कंपन्यांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे उत्पादन कमी केले आहे. फटाक्यांवर देवीदेवतांची चित्रेही वापरणे या कंपन्यांनी बंद केले आहे. एकंदरीत न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि नागरिकांमध्ये झालेली जागृती यामुळे फटाक्यांच्या विक्रीत पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.