ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे; मोठ्या दुर्घटनेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:27 PM2023-03-15T12:27:03+5:302023-03-15T12:28:14+5:30

नवीन पुलाच्या बांधकामात विलंब, रस्त्याची झाली दुर्दशा

Cracks in the retaining wall of the British-era Ajni railway bridge Nagpur; Fear of a major disaster | ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे; मोठ्या दुर्घटनेची भीती

ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे; मोठ्या दुर्घटनेची भीती

googlenewsNext

नागपूर : ब्रिटिशांनी बांधलेल्या अजनी रेल्वे स्थानकाजवळच्या पुलाची (आरओबी) सुरक्षा भिंत आता तुटून पडू लागली आहे. पुलाची आणि आजूबाजूच्या रस्त्याची स्थितीही अत्यंत वाईट झाली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून या पुलाचा वापर सुरु आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ब्रिटिश कालावधीत बांधण्यात आलेल्या या पुलाचा वापर आता धोकादायक आहे, असे अनेक वर्षांपूर्वीच संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे. तरीसुद्धा या पुलाच्या खाली लोखंडी रॉड, अँगल लावून पुलाचा वापर सुरूच ठेवण्यात आला आहे. पुलावरून रोज हजारो वाहने धावतात तर पुलाखालून मोठ्या संख्येत रेल्वेगाड्या धावतात. अशात आता या पुलाच्या सुरक्षा भिंतीचे दगड पडू लागले आहे. या पुलावरच्या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून वाहन धक्के खात जातात. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, जुन्या पुलाजवळूनच केबल स्टेड ब्रिज बनविण्याचे ठरले आहे. मात्र, अद्याप त्याच्या कामाला गती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन पुलाच्या निर्मितीसाठी निधीचा मुद्दा आहे. नवीन पुलाचे बांधकाम तसेच रस्ता रूंदीकरणासाठी काही दिवसांपूर्वीच येथील दुकाने तोडण्यात आली. जागाही सपाट करण्यात आली. मात्र, कामाला गती न मिळाल्याने या पुलावरची वाहतूक सुरूच आहे.

धोक्याचा मार्ग बंदच करावा

शहरात गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी अनेक पुलांचे बांधकाम झाले. विविध भागातील सिमेंटच्या रस्त्याच्या बांधकामासाठी अनेकदा मार्ग बंद करण्यात आले, काही ठिकाणचे मार्गही वळविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास झाला. मात्र, अजनी पुलाचा रस्ता सुरूच असल्याने मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे हा धोक्याचा मार्ग बंदच करावा. नागरिकांना थोडा त्रास होईल मात्र ते सुरक्षित राहतील. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

Web Title: Cracks in the retaining wall of the British-era Ajni railway bridge Nagpur; Fear of a major disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.