जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:21 AM2018-09-01T00:21:13+5:302018-09-01T00:22:02+5:30
लोकात जाऊन मिसळा, जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील ठाणेदारांना दिले. नागपुरात रुजू झाल्यानंतर डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी पहिली क्राईम मिटींग घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकात जाऊन मिसळा, जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील ठाणेदारांना दिले. नागपुरात रुजू झाल्यानंतर डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी पहिली क्राईम मिटींग घेतली.
एनकॉप्समध्ये झालेल्या या बैठकीत शहरातील ३० पोलीस ठाण्यांचे ठाणेदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. डॉ. उपाध्याय यांनी त्यांना संबोधित करताना कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांवर मेहेरनजर ठेवणाऱ्यांना कोणत्याच परिस्थितीत माफी मिळणार नाही, असा इशारा दिला.
नागरिक सोबत असले की पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावणे सहज सोपे होते. त्यामुळे नागरिकांचा विश्वास जिंकण्यावर त्यांनी खास भर दिला. नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांच्यात जावे लागेल. त्यांना मदत करावी लागेल. त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्या लागतील तरच नागरिक पोलिसांवर विश्वास करतील. हे एकदा झाले की गुन्हेगारी नियंत्रण करणे फारच सोपे होईल. गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करा. सराईत गुन्हेगारांना कोणत्याच स्थितीत सोडू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि त्यांच्या मूळ जागी, कारागृहात डांबा, असेही आदेश त्यांनी ठाणेदारांना दिले. एखादा पूर्वाश्रमीचा गुन्हेगार समाजाच्या प्रवाहात सहभागी होऊन कामधंदा करीत असेल. चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विनाकारण त्रास देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. शहरातील काही पोलीस ठाण्याच्या कामकाजावर तसेच दोष सिद्धतेचे प्रमाण नगण्य असल्याच्या मुद्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणत्या भागात किती अवैध धंदे आहेत, किती गुन्हेगार सक्रिय आहेत, त्यावर लक्ष ठेवून दक्षपणे काम करण्यास त्यांनी ठाणेदारांना सांगितले. ज्या ठाण्यातील कामगिरी चांगली दिसली नाही, त्या संबंधित ठाणेदारांना त्याचा ‘अहवाल’ मागितला जाईल, असे सांगून त्यांनी भलत्या कामात गुंतलेल्यांना एकप्रकारे इशाराही दिला.
फूट पेट्रोलिंगवर भर
रस्त्यावर वाहनांनी फिरण्याऐवजी वस्त्यावस्त्यात पायी फिरा (फूट पेट्रोलिंग) असा सल्ला देताना त्यांनी ठाणेदारांना त्यामागचे फायदेही सांगितले. रस्त्याने चालताना पोलीस दिसले की गुन्हेगार दुरूनच पळून जातील. नागरिक, विशेषत: महिला-मुली बिनधोकपणे रस्त्यावर वावरतील आणि नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवरही त्यांनी भाष्य केले. शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली करण्याची आमची जबाबदारी आहे. वाहनचालकांना विनाकारण आपल्याकडून त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही डॉ. उपाध्याय यांनी दिला. डॉ. उपाध्याय यांनी शहरात विविध पदावर यापूर्वी काम केलेले आहे. त्यांना नागपुरातील गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्थेसह येथील विविध क्षेत्राचा आणि घडामोडीचाही चांगला अभ्यास आहे. त्यांची ही पहिलीच क्राईम मिटींग असल्यामुळे अनेक ठाणेदार होमवर्क करूनच बैठकीला गेले होते.