‘चिल्ड वॉटर’ व्यावसायिकांसाठी नवीन कायदा तयार करा
By admin | Published: May 14, 2017 02:19 AM2017-05-14T02:19:45+5:302017-05-14T02:19:45+5:30
शासनाने ‘चिल्ड वॉटर’चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायदा तयार करावा आणि कायदा तयार होईपर्यंत
असोसिएशनची मागणी : संविधान चौकात केले आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने ‘चिल्ड वॉटर’चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायदा तयार करावा आणि कायदा तयार होईपर्यंत व्यावसायिकांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी ‘आर. ओ. चिल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर वेलफेअर असोसिएशन नागपूर’च्या वतीने करण्यात आली. विविध जिल्ह्यातून आलेल्या व्यावसायिकांनी आपल्या मागण्यांसाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या रेटून धरल्या.
अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून मागील काही दिवसात ‘चिल्ड वॉटर’ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. आर.ओ.च्या वतीने बँक, आॅफिस, शॉपींग मॉल, बाजार, कंपनीत शुद्ध आणि थंड पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. येथे पाणी उपलब्ध न झाल्यास थंड पाण्यासाठी फ्रीजची व्यवस्था करावी लागते. मध्यमवर्गीय कुटुंबांना पाण्याची बॉटल खरेदी करणे शक्य नसून २० लिटर पाणी आर.ओ.तर्फे केवळ ३० ते ४० रुपयात उपलब्ध करून देण्यात येते. परंतु अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत असून व्यावसायिकांसाठी कायदा तयार करण्याची मागणी ‘आर. ओ. चिल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर वेलफेअर असोसिएशन नागपूर’च्या वतीने करण्यात आली. नागपूर शहर, नागपूर जिल्हा, वर्धा, काटोल, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली येथून आलेल्या व्यावसायिकांनी संविधान चौकात जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. आंदोलनात विमल अग्रवाल, राजकुमार पांडे, नितीन कुंभारे, प्रशांत दहिकर, राहुल गुल्हाने, मनीष बरगट, मृणाली मोहता, आनंद कळंबे यांच्यासह व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.