‘वर्क फ्रॉम होम’करिता नवे नियम व कायदे तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:30 AM2020-09-10T00:30:43+5:302020-09-10T00:32:22+5:30
कोरोना महामारीच्या काळात नव्याने विकसित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीमुळे भविष्यात उत्पादकता आणि कुशलता वाढणार आहे. या कार्यपद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून याकरिता नवीन नियम आणि कायदे तयार करावेत, अशी मागणी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीच्या काळात नव्याने विकसित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीमुळे भविष्यात उत्पादकता आणि कुशलता वाढणार आहे. या कार्यपद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून याकरिता नवीन नियम आणि कायदे तयार करावेत, अशी मागणी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
या कार्यपद्धतीत भविष्यात कर्मचारी आणि मालकांमध्ये वाद वाढणार आहेत. त्यात निवाडा आणि प्रणाली सक्षम बनविण्यासाठी मजबूत नियम व कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. लोकमतशी चर्चेदरम्यान ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, कोरोनाने भारत आणि जगात एका नवीन कार्यप्रणालीला जन्म दिला आहे. वेळ आणि परिस्थिती पाहून स्वत:च अस्तित्वात आली असून विपत्रीत परिस्थितीत काम करण्यासाठी एक यशस्वी मॉडेल ठरले आहे. कॉर्पोरेट, उद्योग आणि छोट्या व्यवसायाशी जुळलेल्या क्षेत्रानेही या प्रणालीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून अवलंब केला आहे. यामध्ये अनेक लाभांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक कमी करण्याची क्षमता आहे. कोरोनानंतरही हे मॉडेल सुरूच राहणार असून पुढे गतिशील बनणार आहे. नव्यानेच जन्म झालेल्या या प्रणालीसाठी नियम वा कायदे नाहीत. पंतप्रधानांनी सर्व पैलूंचा विचार करून वर्क फ्रॉम होम वर्किंग मॉडेलकरिता एक विस्तृत व व्यापक नियम आणि कायदे तयार करावेत.
भरतीया म्हणाले, कोणत्याही कंपनीचा १७ टक्के खर्च पायाभूत सुविधांवर होतो. वर्क फ्रॉम होम संकल्पनेत कंपन्यांच्या या खर्चात १२ टक्के बचत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कमी होऊन रस्त्यावरील भार कमी होण्यासह प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कोरोना लॉकडाऊन आणि त्यानंतरही वर्क फ्रॉम होम मॉडेल राज्य व केंद्र शासन, बँकिंग क्षेत्र, व्यापार, उद्योग, आरोग्य सेवा, शैक्षणिक क्षेत्र, मीडिया, मनोरंजन, विमा, वित्तीय सेवा आणि विभिन्न अन्य क्षेत्रात यशस्वीरित्या सुरू राहणार आहे. याशिवाय वैयक्तिक चर्चा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलन, संस्थांचे एजीएम, राजकीय रॅली आदींसह अन्य कार्यक्रमही व्हर्च्युअल सुरू आहेत. हे मॉडेलचा अवलंब वेगाने होत असून यशस्वी प्रयोग असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.