आरक्षणानेच गुणवत्ता निर्माण केली
By admin | Published: February 25, 2016 03:07 AM2016-02-25T03:07:07+5:302016-02-25T03:07:07+5:30
जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे.
अशोक गोडघाटे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ विषयावर व्याख्यान
नागपूर : जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे. त्यांच्यामुळे शोषित- वंचितांना मिळालेल्या आरक्षणानेच देशात गुणवत्ता निर्माण होऊ शकली, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ या विषयावरील व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प बुधवारी गुंफण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, व्ही.टी. चिकाटे, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. गोडघाटे म्हणाले, हयात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा हयात नसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिक बलशाली आहेत. ते म्हणत भारतात अन्याय अत्याचाराचे मूळ धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांना प्रमाण मानत येथील धर्मग्रंथांच्या आधारावर येथील मानवाला पशुतुल्य वागणूक दिली. या गुलामीला स्वत: गुलामांनी मान्यता दिली होती, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. उकिरड्यावर फेकलेल्या पत्रावळीसाठी भांडणारा समाज आज एअर कंडिशन गाड्यात फिरतो आहे ही बाबासाहेबांच्या क्रांतीची झलक आहे. हे एक मोठे परिवर्तन घडून आले आहे. दलित, आंबेडकरवादी साहित्य प्रवाहाला जन्म दिला. ज्या धर्मांनी त्यांना लाथाडले होते, आज त्याच धर्माची चिकित्सा करण्याचे बळ आंबेडकरी विचाराने प्रदान केले आहे. १९२९ ला बाबासाहेबांनी सायमन कमिशनला दिलेल्या निवेदनात त्यांनी अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. जगाच्या पाठीवरती एवढे परिवर्तन एका माणसाने घडवून आणलेले कुठेही दिसत नाही,असेही प्रा. गोडघाटे यांनी सांगितले. डॉ. मालती इंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेश त्रिपाठी यांनी संचालन केले. डॉ. गौतम कांबळे व डॉ. अविनाश फुलझेले यांनी परिचय करून दिला. प्रा. तेलकापल्लीवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकर नव संस्कृतीचे निर्माणकर्ते -खांडेकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका नव संस्कृतीचे निर्माणकर्ते आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. बाबासाहेबांनी आपल्याला मानवी विकासाची संस्कृती दिली आहे. त्यामुळे शब्दरूपात न अडकता विकलांग-दिव्यांग, समता- समरसता याचा अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.