मानवतावादी दृष्टिकोनातून विधायक उपक्रम राबवा
By admin | Published: May 28, 2016 03:03 AM2016-05-28T03:03:35+5:302016-05-28T03:03:35+5:30
रक्तदान शिबिर, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनसामुग्रीचे वाटप अशा विधायक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकतेची बीजे रोवली जातात.
देवेंद्र फडणवीस : रक्तदान व दिव्यांग मोजमाप शिबिर
नागपूर : रक्तदान शिबिर, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनसामुग्रीचे वाटप अशा विधायक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकतेची बीजे रोवली जातात. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोनातून समाजात विधायक उपक्रम राबवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
लकडगंज येथील पाटीदार समाज भवन येथे शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन सुरक्षा सप्ताह (रक्तदान शिबिर), दिव्यांग मोजमाप शिबिर तसेच महाराजस्व अभियानांतर्गत होणारे कार्य नागरिकांना सुलभतेने करता यावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार कृष्णा खोपडे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, संपर्क प्रमुख प्रा.प्रमोद पेंडके, नगरसेवक महेंद्र राऊत, पाटीदार समाजाचे अध्यक्ष हरीभाऊ साकला, संयोजक संजय अवचट, योगेंद्र शाहू उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त १ ते २७ मे या कालावधीत पूर्व नागपूरमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये एकूण ४ हजार ५०० लोकांनी रक्तदान केले. तसेच दिव्यांग बांधवांना आवश्यक असणाऱ्या शारीरिक अवयवांसाठी येथे मोजमाप करण्यात आले. यासाठी ६०० दिव्यांगाची नोंदणी झाली होती. मागणीप्रमाणे जयपूर येथून दिव्यांगासाठी अवयव बोलवून त्यांना वाटप करण्यात येईल. यावेळी दिव्यांगाना ई-रिक्षा, झेरॉक्स मशीन, ट्रायसिकल आदी रोजगार साहित्याचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. तसेच महाराजस्व अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व सुविधेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. संचालन महेंद्र राऊत यांनी केले. (वा. प्र.)