महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 09:18 PM2018-05-19T21:18:00+5:302018-05-19T21:31:23+5:30
तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेत धर्मातील सामाजिक शांती व समता या विषयावर ते बोलत होते. आचार्य लोकेश मुनी म्हणाले, मोक्षाचा मार्ग सांगणारे अनेक आहेत. पण मुक्तीचा मार्ग दाखवणारे जीवनच सार्थक आहे. विश्वशांतीच्या पूर्वी मनाची शांती महत्त्वाची आहे. व्यक्ती शांतीचा शोधासाठी मंदिर, हिमालयात जाऊन येतात. आता तर अंतरिक्षामध्येही घर बांधण्यासाठी प्लॉटचे बुकिंग केले जात आहे. हे सर्व शांततेच्या शोधासाठी सुरू आहे. परंतु कुणीही आपल्या मनात ती शोधत नाही. आपले मन शांत नसेल तर व्यक्ती शांत राहूच शकत नाही. त्यामुळे मनाची शांती हीच सर्वात महत्त्वाची आहे. तथागत गौतम बुद्धाने नेमका हाच संदेश दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दीक्षाभूमीवरून जगात जावा शांतीचा संदेश - अब्दुल फलाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमीवरून बुद्धाचा शांती व करुणेचा संदेश पुनर्जिवित केला, त्या दीक्षाभूमीवरून तो जगभरात पोहाचावा, असे आवाहन मुस्लीम समजाचे विचारवंत अब्दुल फलाही यांनी केले. इस्लाम याचा अर्थ शांती होय. इस्लाम धर्म हा शांतीचा धर्म आहे. परंतु समाजात काही असमाजिक तत्त्व असे आहेत. जे समाजात कटुता निर्माण करतात. त्यांना रोखून शांतीचा संदेश पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगभरातील बौद्ध विचारवंतांनी मांडली समतेची संकल्पना
परिषदेच्या एका सत्रात जगभरातील बौद्ध विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची संकल्पना विषद करीत तथागत गौतम बुद्धांचा धम्म समजावून सांगितला. थायलंडच्या डॉ. सिरीकोतन मनिरीन, राजकुमारी मारिया अमोर, राकुमारी सिसोवॉट, गगन मलीक यांच्यासह महाबोधी सोसायटी श्रीलंकेचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, बांग्लादेश येथील भंते बानाश्री महाथेरा संघनायका आदींनी समतेची संकल्पना विषद केली. तसेच थायलंड कंबोडिया येथील कलावंतांनी आपापल्या देशातील कलाही सादर केली.
उद्या परिषदेत
सकाळी ७ वाजता बुद्ध वंदना
सकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर मानवीय अधिकारांचे पुरस्कर्ते व आधुनिक भारताचे शिल्पकार यावर खा. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान.
सकाळी १०.१५ वाजता म्यानमार येथील कलावंतांचे नृत्य सादरीकरण
सकाळी १०.४५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व मार्गदर्शन
दुपारी १२ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम
दुपारी २ वाजता पाली तथा जागतिक भाषांमधील बौद्ध धम्माचे मानवतावादी तत्त्वज्ञान
दुपारी ४ वाजता बौद्ध राष्ट्रांच्या प्रगतीत बुद्ध धम्माचे योगदान यावर मार्गदर्शन
सायंकाळी ७.३० वाजता अहिंसक अंगुलीमाल नाटक (दीक्षाभूमीवर)