मेट्रोच्या बॅलन्स्ड कॅन्टी लिव्हर पूलाची निर्मिती आश्चर्यकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:19+5:302021-09-04T04:13:19+5:30
नागपूर : सीताबर्डी येथील आनंद टॉकीजजवळील रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या बॅलन्स्ड कॅन्टी लिव्हर पुलाचे काम आश्चर्यकारक आहे. मेट्रोच्या संपूर्ण ...
नागपूर : सीताबर्डी येथील आनंद टॉकीजजवळील रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या बॅलन्स्ड कॅन्टी लिव्हर पुलाचे काम आश्चर्यकारक आहे. मेट्रोच्या संपूर्ण बांधकामात हा पूल अद्ययावत तंत्रज्ञानाचा नमुना ठरणार आहे. या पुलाचे बांधकाम अखेरच्या टप्प्यात असून दोन्ही बाजूंना जोडण्याचे काम शिल्लक आहे. या कामाकरिता रेल्वेकडून ब्लॉक घेण्याची गरज नाही. हा पूल महामेट्रोच्या रिच-४ अंतर्गत असलेल्या सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगर मेट्रो स्टेशन सेक्शनचा भाग आहे.
सीताबर्डी इंटरचेंज आणि कॉटन मार्केट मेट्रो स्टेशनमध्ये बॅलन्स्ड कॅन्टी लिव्हर आहे. या मार्गावर काम करणे आव्हानात्मक होते. नागपूर रेल्वे स्टेशन अतिशय व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. अशाही परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योजना आखून काम केले. कामाआधी या जागेचे निरीक्षण आणि सर्वेक्षण करण्यात आले. या माध्यमातून बॅलन्स्ड कॅन्टी लिव्हर येथे उभारणे योग्य असल्याचे निश्चित झाले. किंमत, सुरक्षा आणि एकूण या कामावर येणाऱ्या खर्चाच्या दृष्टीने हा सर्वोत्तम उपाय होता. पुलाला कॅन्टी लिव्हर कन्स्ट्रक्शन पुलाच्या नावानेदेखील ओळखतात. पुलाची लांबी २३१.२ मीटर आहे. बांधकाम करताना रेल्वेगाड्यांच्या वर्दळीवर काहीही परिणाम झाला नाही.
पुलाचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले. यादरम्यान कोविड नियमांचे पालन करण्यात आले. बांधकाम वेगात सुरू असल्याने काम वेळेत पूर्ण होणार असल्याचा महामेट्रो अधिकाऱ्यांचा दावा आहे.