सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार; डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन

By जितेंद्र ढवळे | Published: January 20, 2024 03:41 PM2024-01-20T15:41:59+5:302024-01-20T15:42:13+5:30

नागपूर : सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार असतो, असे प्रतिपादन ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र ...

Creative writer, commentator on social life; Dr. Proposition by Ravindra Shobhane | सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार; डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन

सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार; डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन

नागपूर : सर्जनशील लेखक समाज जीवनाचा भाष्यकार असतो, असे प्रतिपादन ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘सर्जनशील साहित्याची निर्मिती’ या विषयावर आयोजित व्याख्यानात शोभणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव कोरेटी होते. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. संजय पळवेकर व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विकास जांभूळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. शोभणे यांनी मराठीतील सर्जनशील साहित्याची निर्मितीप्रक्रिया सविस्तर स्वरूपात उलगडून दाखविली. मराठीतील विविध कथांची व कादंबरीकृतींची वैशिष्ट्यपूर्णता त्यांनी याप्रसंगी विशद केली. लेखकाचे समाज जीवनविषयक ज्ञान जितके समृद्ध असेल, तितके त्याचे कथनपर लेखन हे सकस रूप धारण करत असते. लेखकाच्या अनुभवविश्वाची समृद्धी ही अंतिमतः त्याच्या लेखनाला समृद्धी बहाल करत असते. मराठी साहित्यातील नामवंत कथाकारांचे व कादंबरीकारांचे लेखन हे मराठी समाजाचे जीवनविषयक भान व्यापक करणारे ठरल्याचे प्रतिपादन त्यांनी व्याख्यानातून केले. मराठीतील सर्जनशील साहित्याचे आशयतत्त्व आणि अभिव्यक्तीरूप त्यांनी विविध कलाकृतींच्या उदाहरणांसह सुस्पष्ट करून दाखवले. सर्जनशील लेखक समाजजीवनातील नाना प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध साहित्यिक पातळीवरून घेत असतो, या प्रकारची मांडणी डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या व्याख्यानातून केली. प्रास्ताविकपर मनोगत मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Creative writer, commentator on social life; Dr. Proposition by Ravindra Shobhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.