जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 12:26 PM2022-01-28T12:26:33+5:302022-01-28T12:31:34+5:30
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
स्नेहलता श्रीवास्तव
नागपूर : अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. मोतीलाल मदान यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रा. मदान कधीही कोणाच्या दबावाला बळी पडले नाही. त्यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही आणि पात्र असलेल्या प्रत्येकाला न्याय दिला. मी नेहमी गुणवंतांनाच प्राधान्य दिले. एकदा माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याकडून शिक्षकांच्या पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. मी त्या सर्वांना त्यांच्या स्वतःच्या बायोडेटाचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बायोडेटाचे मूल्यांकन करण्यास सांगितले. ज्येष्ठता हेच माणसाच्या क्षमता मोजण्याचे एकमेव साधन आहे हे मुख्यमंत्र्यांच्यादेखील लक्षात आले, अशी आठवण त्यांनी ‘लोकमत’ला सांगितली.
हा सन्मान मिळायला विलंब झाला का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी लगेच विज्ञानाच्या भाषेतच त्याचे उत्तर दिले. विज्ञानात उशिरासारखे काही नाही. विज्ञानाची ही एक कृती नाही ज्याला मान्यता मिळाली आहे. हा एक शास्त्रज्ञ म्हणून माणसाच्या स्वभावाचा एकंदर परिणाम आहे. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाल येथे असताना मी 'भ्रूण-हस्तांतरण तंत्रज्ञान' चा प्रकल्प संचालक होतो आणि नंतर आम्ही या तंत्राचा वापर करून एका गाईतून दहा वासरे मिळविण्यात यशस्वी झालो होतो, असे त्यांनी सांगितले.
रणजी चषकातदेखील प्रतिनिधित्व
एक प्रतिष्ठित जैवतंत्रज्ञान संशोधक, पशुवैद्यक, शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहेच. शिवाय ते अतिशय चांगले बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळाडूदेखील आहेत. १९६४ साली रणजी चषकात त्यांनी जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्वदेखील केले होते. शिवाय काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये अनेक मोहिमांचे त्यांनी नेतृत्वदेखील केले. वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील ते अतिशय तंदुरुस्त आहेत.
बॉटनिकल गार्डनची संकल्पना
कृषी विद्यापीठात वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्कृती आणण्यात मदान यांचा मोठा वाटा होता. त्यावेळी वेगळे पशुवैद्यकीय विद्यापीठ नव्हते. तरीही त्यांनी कृषी आणि पशुवैद्यकीय विज्ञान दोन्ही समान विकसित केले. त्यांनी नागपुरात बॉटनिकल गार्डन व्हावे, अशी संकल्पना मांडली व ती पूर्णत्वासदेखील आली, अशी माहिती आयसीएआरच्या कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे माजी अध्यक्ष सी. डी. मायी यांनी दिली.