उद्योगांची विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 29, 2024 06:51 PM2024-06-29T18:51:20+5:302024-06-29T18:51:55+5:30

नितीन गडकरी : तीन दिवसीय ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’

Credibility is the biggest asset of an enterprise | उद्योगांची विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल

Credibility is the biggest asset of an enterprise

नागपूर : उद्योग उभा करण्यासाठी भांडवली गुंतवणूक, अद्ययावत तंत्रज्ञान, इतर संसाधने आणि त्याहीपेक्षा जास्त प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, गुणवत्ता आणि पारदर्शकता आवश्यक आहे. २१ व्या शतकात कुठल्याही उद्योगासाठी या चार गोष्टी सर्वात मोठे भांडवल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

आरपीटीएस मैदानावर आयोजित तीन दिवसीय ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’च्या दुसऱ्या दिवशी ‘व्हिजन’ भारत : इंडियाज सुपर पॉवर स्टेटस’ या विषयावर मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. त्यांनी जैन समाजातील उद्योजक आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर खा. प्रफुल्ल पटेल, माजी खा. अजय संचेती, ‘जीतो’ नागपूर चॅप्टरचे चेअरमन व मुख्य प्रायोजक सीए उज्ज्वल पगारिया, जेबीएनचे चेअरमन राजेश चंदन, आरडीबी ग्रुपचे विनोद दुगर, जीतो सल्लागार बोर्डचे चेअरमन तेजराज गोलछा, जीतोचे माजी अध्यक्ष गणपतराज चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचे २२ ते २४ टक्के, सेवा क्षेत्र ५२ ते ५४ टक्के आणि कृषी क्षेत्राचे १२ ते १४ टक्के योगदान आहे. भारत आत्मनिर्भर व्हायचा असेल तर कृषी विकास दर २५ टक्क्यांपर्यंत न्यावा लागेल. ग्रामीण भागावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण झाल्यास रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक विकास दर वाढून भारत आत्मनिर्भर होईल. उद्योग क्षेत्राने ग्रामीण व कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावे. देशात तंत्रज्ञान आणि संसाधनांची नाही तर उद्योजकतेची कमतरता आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

उद्योजकांनी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार करावा आणि डोळ्यापुढे चीनचे लक्ष्य ठेवावे. विकास साध्य करताना अशक्य असे काहीच नाही. काही वर्षांपूर्वी वाहन उद्योगात आपण जगात सातव्या क्रमांकावर होतो. आज तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठी आपल्याला देशातील गरिबी, बेरोजगारी दूर करावी लागेल आणि उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्राला प्रोत्साहन आणि गुंतवणुक वाढवावी लागेल. त्यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल.

जैन व्यावसायिकांनी देशाचा विकास केला : खा. प्रफुल्ल पटेल

खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाकुंभ शांततेत होत आहे, ही नागपूरसाठी गौरवाची बाब आहे. जैन समाजाच्या एकत्रिकरणासोबतच व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. असे उपक्रम देशात निरंतर राबविल्या गेले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे अन्य स्त्रोत निर्माण करावे लागेल. देश सर्वच स्तरावर प्रगती करीत आहे. आम्ही जगाला मार्ग दाखवित आहोत. गडकरींनी देशात रस्त्यांचे जाळे विणल्याने अर्थव्यवस्था सक्षम झाली आहे. रस्त्यांमुळे शहरांचे अंतर आता कमी झाले. भारतातील सुविधा अत्याधुनिक झाल्या आहेत. आता विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

केवळ पैसे कमवितात, अशी टीका व्यावसायिकांवर नेहमीच होते. केवळ ५ टक्के व्यावसायिक चुकीच्या मार्गाने पैसे कमवितात. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांवर टीका होऊ नये. जैन व्यावसायिकांनी देशाचा विकास केला आहे. त्यांच्याविषयी व्यावसायिक आदर वाढून प्रोत्साहन मिळावे. केवळ या गोष्टीच नाही तर व्यवसायात मेहनतही असावी, असे पटेल यांनी सांगितले.

अजय संचेती म्हणाले, महाकुंभ आयोजनाचा उपयोग वर्तमानासह भविष्यात जैन समाजातील उद्योजक आणि व्यावसायिकांना नक्कीच होईल. भारताच्या विकास दरात जैन व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे. तो पुढेही वाढत राहील.

प्रारंभी सीए उज्ज्वल पगारिया यांनी महाकुंभ आयोजनाची माहिती आणि उद्देश सांगितले. महाकुंभमध्ये देशविदेशातून २ हजारांहून अधिक जैन व्यावसायिक आणि ५५ वक्ते आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे. कार्यक्रमात जैन व्यावसायिक आणि जीतो संघटनांच्या विविध विंगचे पदाधिकारी, महिला, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Credibility is the biggest asset of an enterprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.