नागपुरातील तिहेरी हत्याकांडात क्रिकेट बुकींची खलनायकी भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 07:15 AM2022-01-21T07:15:00+5:302022-01-21T07:15:02+5:30
Nagpur News जरीपटक्यातील तिहेरी हत्याकांड आणि आरोपीच्या आत्महत्येच्या प्रकरणात जरीपटक्यातील दोन बुकींसह अनेकांनी खलनायकाची भूमिका वाढविल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
नरेश डोंगरे !
नागपूर : जरीपटक्यातील तिहेरी हत्याकांड आणि आरोपीच्या आत्महत्येच्या प्रकरणात जरीपटक्यातील दोन बुकींसह अनेकांनी खलनायकाची भूमिका वाढविल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
चायनीज फूड विकणारा मदन अग्रवाल याने त्याची पत्नी किरण मुलगा वृषभ आणि मुलगी टिया या तिघांची निर्घृण हत्या केली आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी उघड झालेल्या या तिहेरी हत्याकांड आणि आत्महत्या प्रकरणाने जरीपटक्यात शोकसंतप्त वातावरण आहे. मदन याला हे अमानुष कृत्य करण्यासाठी दोन बुकींसह काही सट्टेबाजांनी विवश केल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे.
मदन अग्रवालला क्रिकेट सट्टा आणि मटक्याची लगवाडी करण्याचे व्यसन होते. यात त्याने सर्वस्व गमावले होते. स्वतःजवळची रोकड, बायको-मुलांचे दागिने गमावल्यानंतर त्याने स्वतःचे राहते घरही बँकेत गहाण ठेवले होते. एवढे करूनही त्याच्यावर बुकी आणि सट्टेबाजांचे ३० ते ४० लाखांचे कर्ज होते. ते वसूल करण्यासाठी बुकी, सट्टेबाज आणि त्यांचे पंटर मदनला रात्रंदिवस त्रास देत होते. वारंवार प्रत्यक्ष भेटून, फोन करून त्याला रोकड मागत होते, धमक्याही देत होते. त्यामुळे मदन प्रचंड दहशतीत आला होता. तो कधीकधी मनोरुग्णसारखा वागायचा. बुकी आणि सट्टेबाजांची रोकड परत केली नाही तर ते काहीही करू शकतात, अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती. त्यातूनच त्याने आपल्या पत्नी तसेच मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली, असा संशयवजा अंदाज संबंधित वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
सर्वाधिक बुकी जरीपटक्यात
विशेष म्हणजे, नागपुरात सर्वाधिक बुकी आणि सट्टेबाज जरीपटक्यात आहेत. ‘लोकमत’ने त्याचा वेळोवेळी खुलासाही केला आहे. पोलिसांकडून थोडे दुर्लक्ष झाले की, ही मंडळी लाखोंची खयवाडी, लगवाडी करतात. उधारीवर हा गोरखधंदा चालतो. उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी अनेक बुकींनी कुख्यात गुंडांनाही हाताशी ठेवलेले आहे. या बुकी आणि गुंडांनीच मदनला हे अमानुष कृत्य करण्यास विवश केल्याचे बोलले जाते. पोलीसही या संबंधाने तपास करीत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस या संबंधाने काही उघडपणे बोलायला तयार नाहीत. मात्र दोन बुकींसह अनेकांच्या भूमिकेची पोलीस चौकशी करीत आहेत.
मोबाईलमध्ये दडले आहे रहस्य
मदनच्या मोबाईलमध्ये या प्रकरणाचे रहस्य दडले असल्याचे सांगितले जाते. त्याला कर्जवसुलीसाठी सोमवारी (दि. १७) रात्री अनेकांनी वारंवार फोन केल्याचे उघड झाले आहे. बुकी नेहमी दुसऱ्याच्या नावाने मोबाईल आणि सिमकार्ड खरेदी करतात आणि त्याचा सट्टेबाजी तसेच वसुलीसाठी वापर करतात. या प्रकरणातही असेच झाल्याचा संशय आहे. त्यामुळे घटनेपूर्वी मदनला ज्या नंबरवरून फोन आले, प्रत्यक्ष ज्याच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल आहे त्याची आणि त्याच्या माध्यमातून या प्रकरणाला कारणीभूत असल्याचीही चौकशी करीत आहेत.
---