जा रे जा रे पावसा... होऊ दे क्रिकेटचा ‘जलसा’; क्रिकेट चाहत्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 12:08 PM2022-09-23T12:08:44+5:302022-09-23T12:19:42+5:30

सराव सत्र रद्द झाल्याने चिंता; आभाळाकडेच सर्वांचे लक्ष, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

cricket fan's prayer to rain god to spare nagpur IND vs AUS T20 match on sep 23 | जा रे जा रे पावसा... होऊ दे क्रिकेटचा ‘जलसा’; क्रिकेट चाहत्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

जा रे जा रे पावसा... होऊ दे क्रिकेटचा ‘जलसा’; क्रिकेट चाहत्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

Next

निनाद भोंडे

नागपूर : तब्बल तीन वर्षांनंतर नागपूरच्या जामठा स्टेडियमवर शुक्रवारी होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पावसाचे सावट आहे. कुठल्याही परिस्थितीत वरुणराजाने एक दिवस विश्रांती घ्यावी व सामना व्हावा, अशीच प्रार्थना क्रिकेट चाहते करत आहेत. पावसाचा अंदाज असला तरी नागपूरकरांच्या उत्साहात कुठेही कमी आलेली नाही. शहरात होणारा सामना चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणेच असून, आता सर्वांचे लक्ष आभाळाकडेच लागलेले आहे. दरम्यान, सामन्याच्या दृष्टीने सोमवारी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून, रात्री वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यावर जास्त भर राहणार आहे.

गुरुवारी दोन्ही संघ सराव करतील, या आशेने चाहते हॉटेल तसेच मैदानाजवळ जमले होते. ठरलेल्या वेळापत्रकानुसार दुपारी १ वाजता ऑस्ट्रेलियाचे, तर संध्याकाळी ५ वाजता भारतीय संघाचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र, मैदान खेळण्यायोग्य परिस्थितीमध्ये नसल्यामुळे दोन्ही संघांच्या व्यवस्थापकांनी सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जाेरदार पावसाचा इशारा हटला, दुपारी नवा अंदाज येणार

बुधवारपर्यंत विदर्भात जाेरदार पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने त्यांच्या संकेतस्थळावरून हटविला आहे. शुक्रवार व शनिवारी जाेराचा पाऊस हाेण्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे नागपूरला हाेणाऱ्या क्रिकेट सामन्याला आतूर असलेल्या चाहत्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी हलका पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नागपूर हवामान विभागाचे उपमहासंचालक एम. एल. साहू यांनी सांगितले, मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने २३ सप्टेंबरला जाेरदार पाऊस हाेण्याचा इशारा देण्यात आला हाेता. मात्र, ही स्थिती उत्तर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाकडे सरकली आहे. यामुळे विदर्भात जाेराचा पाऊस हाेण्याची शक्यता नसल्याने इशारा हटविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी हलका पाऊस हाेण्याची शक्यता सध्या तरी कायम असल्याचे ते म्हणाले. मात्र, शुक्रवारी किती प्रमाणात पाऊस हाेईल, याबाबत दुपारीच अंदाज स्पष्ट करण्यात येईल.

संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकले

गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात पाऊस सुरू असल्याने व्हीसीएच्या संपूर्ण मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले होते. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी मैदान कोरडे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. संपूर्ण मैदान खेळण्यायोग्य बनविण्याचा या कर्मचाऱ्यांचा मानस आहे. दिवसभर पाणी शोषणाऱ्या चार सुपर सॉपर मशीनही मैदानावर सतत फिरत होत्या. मुख्य मैदानाचा भाग कोरडा करण्यात कर्मचारी यशस्वी ठरले असले तरी सीमारेषेजवळचा ओलसरपणा कायम आहे.

खेळपट्टीची विशेष काळजी

मध्यवर्ती खेळपट्टीवर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी एक विशेष आच्छादन अंथरले होते. तसेच त्यावर काही लोखंडी स्टँड ठेवून पुन्हा वेगळ्या कव्हर्सने ती झाकण्यात आली होती. पण यामुळे खेळपट्टीवर ओलसरपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरूवातीची काही षटके अडचणीची ठरू शकतात. खेळपट्टीतल्या ओलसरपणामुळे चेंडू बॅटवर हळू येतो.

पोलिसांची बारीक नजर

सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात राहणार असून, मैदान परिसरात सर्व्हेलन्स व्हॅन व ‘क्यूआरटी’ची तुकडीदेखील राहणार आहे. विशेष म्हणजे सामना संपल्यावर वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यावर विशेष भर देण्यात येणार असून, ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ४००हून अधिक वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतील. वर्धा मार्गावर इतर मार्गांवरून येणाऱ्या वाहनांना बंदी असेल.

पार्किंगच्या ठिकाणी चिखलाचे आव्हान

पावसामुळे मैदान तर निसरडे झालेच आहे, परंतु पार्किंगच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. व्हीआयपी पार्किंगच्या रस्त्याचीही पावसामुळे दैना झालेली आहे. अनेक ठिकाणी चिखल असल्याने प्रेक्षकांना वाहनांचे पार्किंग करताना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशावेळी कार घेऊन येणाऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. शिवाय वाहन पार्क केल्यानंतर स्टेडियमपर्यंतचे मोठे अंतर चालत जावे लागत असल्यामुळे त्यावेळी चिखलातून अनेकांना मार्ग काढावा लागेल.

रॅडिसनसमोरील पुलावर चाहत्यांची झुंबड

पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले होते. त्यामुळे सरावासाठी जाणाऱ्या खेळाडूंची छबी टिपण्याची संधी नागपूरच्या चाहत्यांना मिळाली नाही. पण हार मानणार ते चाहते कसले. आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक टिपण्यासाठी चाहत्यांनी रॅडिसन ब्ल्यू हॉटेलसमोरच्या उड्डाणपुलावर गर्दी करण्यास सुरूवात केली. पुलावर उभे राहून समोरच्या खिडकीतून एखाद्या तरी खेळाडूचे दर्शन करण्यास चाहते आसुसलेले होते. भारताचा संघ या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे.

मेट्राेचे रिटर्न तिकीटही काढून घ्या, ६० बसेसची व्यवस्था

नागरिकांची सुविधा लक्षात घेता विदर्भ क्रिकेट असाेसिएशनद्वारे सामना सुरू हाेण्यापूर्वी न्यू एअरपाेर्ट मेट्राे स्टेशन ते जामठापर्यंत आणि सामना संपल्यानंतर जामठा ते न्यू एअरपाेट मेट्राे स्टेशनपर्यंत ६० बसेस चालविणार आहे. व्हीसीएच्या विनंतीवरून महामेट्राेनेही अतिरिक्त ट्रेन चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, जातानाचे तिकीट काढताना प्रवाशांनी परतीचे तिकीटही काढून घ्यावे, असे आवाहन महामेट्राेने केले आहे.

महामेट्राेचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी सांगितले, ऑरेंज व ॲक्वा लाईनवर विविध मेट्राे स्टेशनवरून न्यू एअरपाेर्ट मेट्राे स्टेशनपर्यंत रात्री १० वाजतापर्यंत सेवा देण्यात येईल. सामना संपल्यानंतर न्यू एअरपाेर्ट मेट्राे स्टेशनवरून रात्री १ वाजतापर्यंत प्रवाशांना मेट्राे सेवा मिळेल. जामठा स्टेडियमवरून परत येताना क्रिकेटप्रेमींना अडचण येऊ नये म्हणून बाेर्डिंग स्टेशनवरूनच परतीचेही तिकीट घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व्हीसीए आणि महामेट्राेच्या या सुविधेमुळे वर्धा राेडवर ट्रॅफिक जाम हाेणार नाही आणि वाहतूक सुरळीत पार पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अशी असेल चारचाकी वाहनांची पार्किंग

  • जामठा स्टेडियमसमोर
  • व्हीआयपी पार्किंग
  • जामठा टी पॉइंन्ट
  • शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे मैदान
  • सेंट व्हिन्सेंट पलोटी
  • इंजिनिअरिंग कॉलेज मैदान
  • व्हीसीए सदस्य पार्किंग गेट नं १२ व १३
  • राणीकोठी पॅलेस
  • अन्विता फार्म
  • ब्रम्हाकुमारीज आश्रम
  • दुचाकी वाहन पार्किंग
  • जामठा स्टेडियमजवळ

Web Title: cricket fan's prayer to rain god to spare nagpur IND vs AUS T20 match on sep 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.