भरपूर पैसा असल्याने क्रिकेट लाेकप्रिय, भ्रष्टाचार व राजकारणाने इतर खेळांचे नुकसान
By निशांत वानखेडे | Updated: January 18, 2025 18:04 IST2025-01-18T18:03:31+5:302025-01-18T18:04:27+5:30
शशांक मनाेहर : ‘जस्टा काजा’मध्ये ऊर्जामय पॅनल चर्चा

Cricket is popular because of a lot of money, corruption and politics are harming other sports.
नागपूर : आज क्रिकेटमध्ये भरपूर पैसा असल्याने ताे लाेकप्रिय आहे. दुसरीकडे प्रत्येक क्षेत्राप्रमाणे इकडेही असलेला भ्रष्टाचार आणि राजकारणामुळे इतर खेळ देशात मागे पडले, असे स्पष्ट मत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे माजी अध्यक्ष अॅड. शशांक मनाेहर यांनी व्यक्त केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या ‘जस्टा काॅजा’ महाेत्सवात शनिवारी ऊर्जामय पॅनल चर्चेचे आयाेजन करण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकलचे अधिष्ठाता डाॅ. राज गजभिये, लिटूचे कुलगुरू व नीरीचे माजी संचालक डाॅ. अतुल वैद्य आणि कला क्षेत्रातून चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्याशी संवाद साधण्यात आला.
अॅड. मनाेहर म्हणाले, देशात क्रिकेट आज खेळ नसून राेजगाराचे, व्यवसायाचे साधन आहे. क्रिकेट बाेर्ड एका सामन्यात शंभर काेटीपेक्षा जास्त व्यवसाय करताे. प्राथमिक स्तरावर रणजी खेळणारा खेळाडूही बऱ्यापैकी पैसा कमाविताे. वन डे, आयपीएल खेळणाऱ्यांची स्थिती आणखी चांगली असते. तुलनेने इतर खेळांना तसे प्रेक्षक नाही व पैसाही नसल्याने ते कमी लाेकप्रिय आहेत. इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे. सरकारकडून खेळांच्या उन्नतीसाठी मिळणारा पैसा परिपूर्ण वापरला जात नाही. १०० काेटींपैकी फारफारतर २०-३० काेटी कामासाठी खर्च हाेताे. शिवाय राजकारणामुळेही खेळांचा विकास मागे पडताे. यापूर्वीही क्रिकेटमध्येही राजकीय व्यक्तिंचा सहभाग हाेता, पण ताे खेळापुरता असायचा. आता ती परिस्थिती राहिली नसल्याचे स्पष्ट मत अॅड. मनाेहर यांनी व्यक्त केले. सरकारने खेळांच्या विकासासाठी १५०० काेटी दिल्याचे सांगितले जाते. त्यातून सर्व खेळांसाठी प्रत्येकी २० किंवा ३० काेटी निधी येईल. यामुळे खेळांचा विकास हाेणार नाही. त्यापेक्षा सरकारने दरवर्षी दाेन खेळांच्या विकासाकडे पूर्ण लक्ष्य दिल्यास १० वर्षात सर्व खेळांची स्थिती बदलेल, असा विश्वासही अॅड. मनाेहर यांनी यावेळी व्यक्त केला. क्रिकेटमध्ये लागेबांधे किंवा वशिल्याने नाही तर क्षमतेने खेळाडूंची निवड हाेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.