क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:01 AM2017-07-19T02:01:12+5:302017-07-19T02:01:12+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याच्या शिवाजीनगरातील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून रोख व मोबाईलसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Cricketer Umesh Yadav's house stolen | क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी

क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी

Next

शिवाजीनगरातील फ्लॅटमध्ये केली घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याच्या शिवाजीनगरातील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून रोख व मोबाईलसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यादव राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका मजूर युवकानेच ही घरफोडी केली. १२ तासाच्या आत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. आरोपी शिवनी येथील रहिवासी २२ वर्षीय राजेंद्र चौधरी आहे. उमेश यादव याचा शिवाजीनगर येथील एलएडी कॉलेजसमोर एम्प्रेस राईस या अपार्टमेंटमध्ये नवव्या माळ्यावर फ्लॅट आहे. खेळामध्ये व्यस्त असल्याने येथे माळी व घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये-जा असते. तीन दिवसापूर्वी उमेश आपल्या पत्नी व सासूसह येथे आला होता.
सोमवारी सायंकाळी ७ वाजता उमेश कुटुंबासह बाहेर गेला होता. जाताना त्याने फ्लॅटच्या मागील भागातील बालकनीचा दरवाजा उघडा ठेवला होता. याच दरवाजातून आत शिरून चोरटे बेडरुममध्ये ठेवलेले दोन मोबाईल तसेच ४५ हजार रुपये घेऊन पसार झाले. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उमेश घरी परतल्यानंतर त्याला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. उमेश यादव याने मित्र शैलेश ठाकरे व शेजारच्यांना घरी बोलावून घेतले. रात्री ३.३० वाजता शैलेश ठाकरे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. अंबाझरी ठाण्याचे निरीक्षक बी.एस. खंदाळे तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. याच अपार्टमेंटच्या आठव्या माळ्यावर एका फ्लॅटमध्ये इंटेरियर डेकोरेशनचे काम सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
घटनेनंतर येथे काम करणारे युवकसुद्धा पसार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत असताना, सकाळी एक अल्पवयीन मजूर तेथे पोहचला. पोलिसांनी त्याला विचारणा केली. सुरुवातीला तो घटनेची माहितीच नसल्याचे भासवित होता. पोलिसांनी थोडी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने आपला सहकारी राजेंद्र चौधरी हा उमेश यादव यांच्या फ्लॅटमध्ये गेल्याचे सांगितले. उमेश यादव याला बघण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले. तो परतला तेव्हा त्याच्याजवळ पैसे व मोबाईल होते. पोलीस तत्काळ राजेंद्रच्या मागावर शिवनीला रवाना झाले.
अंबाझरी पोलिसांनी सकाळी उमेश व त्याच्या मित्राला तक्रार दाखल करण्यास ठाण्यात बोलाविले होते परंतु भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होत असल्याने उमेश मंगळवारी सकाळीच मुंबईला रवाना झाला. दुपारी १२.३० वाजता उमेशचा मित्र शैलेश याने अंबाझरी ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान दुपारी ३.३० वाजता आरोपी राजेंद्र चौधरी पोलिसांच्या हाती लागला. त्याने चोरी कबूल केली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व नऊ हजार रुपये रोख ताब्यात घेतली. फ्लॅटमधून नऊ हजार रुपये मिळाल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Cricketer Umesh Yadav's house stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.