सरसंघचालकांची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा
By admin | Published: December 23, 2015 03:47 AM2015-12-23T03:47:55+5:302015-12-23T03:47:55+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमातील विधानाचा विपर्यास करून बदनामीचा प्रयत्न...
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमातील विधानाचा विपर्यास करून बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत एका वेब पोर्टल व मजकूर छापणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात नागपुरात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या वेब पोर्टलवरील वादातीत मजकूर अद्याप हटविण्यात आला नसल्याचे नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
‘इंडिया डॉट कॉम’ असे वेब पोर्टलचे नाव असून या पोर्टलवर १६ डिसेंबर रोजी सरसंघचालकांच्या विधानाबाबतचा मजकूर छापण्यात आल्याचे भेंडे यांनी सांगितले. संजय भेंडे यांनी २० डिसेंबर रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे या पोर्टलचे वार्ताहर मोहम्मद अझर शेख, संचालक देबाशिष घोष आणि पोर्टलच्या मुख्य संपादकाविरोधात गुन्हा दाखल केला. तिन्ही लोकांवर कलम १५३(अ) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय भेंडे यांनी सांगितले की, १६ डिसेंबरला नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या कार्यक्रमात सामाजिक समरसता या विषयावर बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समर्थन करीत ‘जातीभेदाचे समूळ निर्मूलन होईपर्यंत आरक्षण कायम ठेवणे गरजेचे आहे’ असे वक्तव्य केले होते.
मात्र संबंधित वेब पोर्टलवर डॉ. भागवत यांनी ‘आरक्षणामुळे जातीय तेढ वाढले आहे’ असे विधान केल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सरसंघचालक दिवसभर नागपुरात असताना हे वक्तव्य इंदूरमधील एका कार्यक्रमाचे असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जातीय तेढ निर्माण करीत सरसंघचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भेंडे यांनी केला.
याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वेब पोर्टलवर बंदी घालून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र दोन दिवस लोटूनही इंडिया डॉट कॉमवरील वादग्रस्त मजकूर अद्याप कायम असल्याचा संताप संजय भेंडे यांनी यावेळी व्यक्त केला. याबाबत आम्ही सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगत त्यांनी चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे भेंडे यांनी स्पष्ट केले. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची रूपरेषा आखण्यात येईल, असा इशारा भेंडे यांनी यावेळी दिला.