नागपुरातील बिल्डर विजय डांगरेंविरुद्ध गुन्हे शाखेने आवळला चाैकशीचा पाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 10:45 PM2021-11-25T22:45:36+5:302021-11-25T22:47:13+5:30
Nagpur News शासनाच्या राखीव जागेवर आलिशान बंगलो स्वस्त किमतीत बांधून देण्याची जाहिरात करून अनेकांकडून लाखो रुपये घेणारे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेने चाैकशीचा पाश आवळला आहे.
नागपूर - शासनाच्या राखीव जागेवर आलिशान बंगलो स्वस्त किमतीत बांधून देण्याची जाहिरात करून अनेकांकडून लाखो रुपये घेणारे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेने चाैकशीचा पाश आवळला आहे. या संबंधाने एका महिला वकिलाने न्यायालयाचे लक्ष वेधताच थंडबस्त्यात टाकण्यात आलेल्या या प्रकरणाची चाैकशीची चक्र गतिमान करण्यात आली आहे. या चाैकशीवर थेट पोलीस आयुक्तांचीच नजर असल्याने बिल्डर डांगरेंच्या अडचणी वाढण्याचे संकेत मिळाले आहे.
विजय डांगरे यांनी सन २००६ मध्ये माैजा चिखलीतील शासनाच्या कम्पोस्ट डेपोसाठी राखीव असलेल्या जागेवर स्वराज पार्क नामक आलिशान गृहप्रकल्प बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांकडून लाखो रुपये घेतले होते. रक्कम दिल्यानंतर बरेच दिवस होऊनही तेथे गृहप्रकल्प बनलाच नाही. ही जमीनच शासनाच्या अधीन असल्याचे लक्षात आल्याने रक्कम देणाऱ्यानी डांगरे यांच्याकडे आपली रक्कम परत मिळावी म्हणून तगादा लावणे सुरू केले.
डांगरेंकडून रक्कम देण्याऐवजी जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने फसगत झालेल्यांच्यावतीने रामूजी बापूराव वानखेडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरून डांगरेंविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यात डांगरे यांना न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच डांगरे यांनी उच्च न्यायालयात शपथपत्र देऊन पीडित ग्राहकांना बंगलो बांधून देईल किंवा त्यांची रक्कम परत करेल, असे नमूद केले होते.
मात्र, त्या शपथपत्राचे उल्लंघन करून या गुन्ह्यातील वादग्रस्त जमीन १३ मे २०१९ ला मुकुल बबनराव देशमुख यांना विकली होती. त्यामुळे सदर गुन्ह्यातील पीडित ग्राहकांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याने डांगरे तसेच वादग्रस्त जमीन विकत घेणारे मुकुल देशमुख (रा. सुरेंद्रनगर) या दोघांविरुद्ध हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गंभीर गुन्हे दाखल होऊनही डांगरेंना एका पोलीस अधिकाऱ्याची साथ असल्याने अटक केली जात नव्हती. हा अधिकारी एका बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगत असल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात पडले होते.
महिला वकिलाकडून न्यायालयात अर्ज
दरम्यान, ११ ऑक्टोबर २०२१ ला ॲड. मीनाक्षी माहेश्वरी यांनी उच्च न्यायालयात अर्ज सादर करून या प्रकरणात केवळ तक्रारदारच नव्हे तर अनेक ग्राहक पीडित असल्याचे नमूद केले. थेट उच्च न्यायालयाचे लक्ष वेधल्या गेल्याने पोलीस आयुक्तांनीच या प्रकरणावर नजर वळविली. त्यामुळे तपासाच्या नावाखाली थंडबस्त्यात टाकण्यात आलेले या प्रकरणाच्या फाईल्स बाहेर काढण्यात आल्या आहे.
गुन्हे शाखेचे आवाहन
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या देखरेखीत आता या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक विजय कसोधन करत असून, गुन्हेशाखेच्या प्रसिद्धीपत्रकाप्रमाणे या प्रकरणात अनेकांची विचारपूस करून जाबजबाब नोंदविण्यात आले आहे. डांगरे यांच्याकडून बंगलो प्रकरणात फसवणूक झाली असल्यास संबंधित ग्राहकांनी गुन्हेशाखेकडे तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
-----