बनावट सुगंधित तंबाखूवाल्यांवर पोलिसांची धडक कारवाई, पकडला लाखोंचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 03:05 PM2022-01-05T15:05:19+5:302022-01-05T15:35:13+5:30

गेल्या दोन आठवड्यांपासून सुपारी तसेच सुगंधित तंबाखू तस्करांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने या गोरखधंद्यातील बडे मासे कुख्यात असलेल्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

crime branch raided on warehouse and seized lakhs of scented tobacco | बनावट सुगंधित तंबाखूवाल्यांवर पोलिसांची धडक कारवाई, पकडला लाखोंचा माल

बनावट सुगंधित तंबाखूवाल्यांवर पोलिसांची धडक कारवाई, पकडला लाखोंचा माल

googlenewsNext
ठळक मुद्देतहसील, लकडगंजमध्ये गुन्हे शाखेची कारवाईएमआयडीसी पोलिसांचा कारखान्यावर छापातस्करांत खळबळ

नागपूर : सध्या तंबाखूवर रासायनिक प्रक्रिया करून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी नजर रोखली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी तहसील आणि लकडगंजमध्ये छापे मारून १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला, तर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सकाळी सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर छापा मारून पाच लाखांची तंबाखू जप्त केली.

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॅण्डलूम मार्केटजवळ कैलास ओमप्रकाश सारडा (वय ५०, रा. ठक्कर बिल्डिंग) याला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ताब्यात घेतले. नंतर त्याच्या सुदाम गल्ली ईतवारीतील गोदामात छापा घालून पोलिसांनी तेथून बाबा १२०, बाबा १६० जाफरानी (सुगंधित तंबाखू) तसेच रजनीगंधा, पानबहार पान मसाला असा ९ लाख, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पोलिसांनी आरोपी सारडाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

दुसरी कारवाई पोलिसांनी निकालस मंदिराजवळ केली. एका पानठेल्यातून पोलिसांनी २५०० रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त केली. हा पानठेला कोणाचा आणि त्याचा मालक कोण, तंबाखू कुणी तेथे आणली त्याचे नाव मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही. गुन्हे शाखेेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, सहायक निरीक्षक पवन मोरे, माधुरी नेरकर, हवलदार ईश्वर खोरडे, रामचंद्र कारेमोरे, शाम अंगुथलेवार, विजय श्रीवास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

गाडगेनगर, एनआयटी गार्डनजवळ आरोपी अनिल शत्रुघ्न जयस्वाल (वय ५३) आणि राहुल अनिल जयस्वाल (वय ३०, दोघेही रा. गाडगेनगर) हे बापलेक बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना चालवित असल्याची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांना कळली. त्यावरून त्यांनी सोमवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह या कारखान्यावर छापा घातला. येथे जयस्वाल बापलेक वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित तंबाखू (बनावट) तयार करीत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तेथून नतरत्न नामक सुगंधित तंबाखूचे ११०० पॅकेट (५५० किलो), ७० हजारांचा खुला सुगंधित तंबाखू, मिक्सर मशीन, दालचिनी, रंग, ग्लिसरिन, मेंथॉल, गुलाबजल, कच्ची तंबाखू असा एकूण ५ लाख ४८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अन्न व औषध विभागाचे अधिकारी अमरनाथ यादव सोनटक्के (वय ४०) यांना घटनास्थळी बोलावून जप्ती पंचनामा करून घेतला. त्यांच्या तक्रारीवरून जयस्वाल बापलेकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

परिमंडल एकचे उपायुक्त लोहित मतानी, सहायक आयुक्त तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक रमेश हत्तीगोटे, एएसआय राजाराम ढोरे, हवलदार नितीन जावळेकर, नूतनसिंग छाडी, नायक इस्माइल नाैरंगाबादे, राकेश तिवारी, दीपक सराटे, सुनील बैस, धर्मेंद्र प्रवीण, रितेश, फईम आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: crime branch raided on warehouse and seized lakhs of scented tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.