ती उद्ध्वस्त करते अन् 'तो' कायमचेच संपवून टाकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 10:34 AM2021-12-12T10:34:08+5:302021-12-12T10:55:44+5:30

आधी ओळख, नंतर मैत्री. तासनतास चॅटिंग अन् त्यानंतर ‘जिना मरना संग संग’च्या आणाभाका घेणारे प्रेमवीर पहिल्या टप्प्यात एक दुसऱ्यांसाठी काहीही करायला तयार होतात. विरोध करणाऱ्या रक्तांच्या नातेवाइकांना शत्रू समजतात.

crime case happens after friendship turns into love then fight and breakup | ती उद्ध्वस्त करते अन् 'तो' कायमचेच संपवून टाकतो!

ती उद्ध्वस्त करते अन् 'तो' कायमचेच संपवून टाकतो!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेमा तुझा रंग कसा रे...?कथित प्रेमाचा भयावह शेवटमहिनाभरात १० गुन्हेडॉक्टर, अभियंता, विद्यार्थी अन् नोकरदारही

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका टप्प्यावर जीव ओवाळून टाकणारे प्रेम दुसऱ्या टप्प्यावर एकमेकांना उद्ध्वस्त करण्याचा अतिरेक करत आहे. उपराजधानीत महिनाभरात घडलेल्या काही घटनांमधून समाजमन अस्वस्थ झाले आहे. त्याचमुळे हे प्रेम की आणखी काही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आधी ओळख, नंतर मैत्री. तासनतास चॅटिंग अन् त्यानंतर ‘जिना मरना संग संग’च्या आणाभाका घेणारे प्रेमवीर पहिल्या टप्प्यात एक दुसऱ्यांसाठी काहीही करायला तयार होतात. विरोध करणाऱ्या रक्तांच्या नातेवाइकांना शत्रू समजतात. या स्थितीत त्यांचा मुक्त वावर सुरू असतो. धम्माल मस्ती, फिरणे, खाणे अन् गाण्यासोबतच बेभान होऊन ते सर्व मर्यादा ओलांडतात. पती- पत्नीसारखे एकमेकांवर हक्क दाखवतात. विशिष्ट कालावधीनंतर मात्र त्यांच्यातील प्रेम ओसरू लागते. तिला दुसरा चांगला किंवा त्याला दुसरी चांगली मिळाली की, पहिल्या साथीदाराला टाळणे सुरू होते.

दुसऱ्याशी भेटीगाठी वाढल्याचा संशय आल्याने ती किंवा तो पेटून उठतो. नंतर सुरू होतो लग्नासाठी तगादा अन् या तगाद्यातच दडली असते तिच्या किंवा त्याच्याबद्दलची सूडभावना. कथित प्रेमाचा उद्रेक होतो अन् दगाबाजी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध ती पोलिसांकडे धाव घेते. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावते. त्याच्या दगाबाजीची शिक्षा ती त्याला काैटुंबिक, सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या रूपाने देते.

त्याची बाजूही अशीच खतरनाक आहे. प्रेयसीने दगा दिला तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो. जालीम जमान्यापासून तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आटापिटा करणारा प्रियकर या वळणावर चक्क तिला संपवूनच टाकण्याचा प्रयत्न करतो. नागपुरात दगाबाजीनंतर कथित प्रेम प्रकरणाने घेतलेले जीवघेणे वळण समाजमन अस्वस्थ करणारे ठरले आहे. प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराचा आरोप लावून त्याला उद्ध्वस्त करण्याचे महिनाभरात आठ, तर दगाबाजी करणाऱ्या प्रेयसीची हत्या करण्याचे आणि हत्येचा प्रयत्न करण्याचे दोन गुन्हे घडले आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील कथित पीडित आणि आरोपींमध्ये कुणी डॉक्टर आहे, कुणी अभियंता, कुणी विद्यार्थी, तर कुणी नोकरदार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या चाैकशीतून पुढे आलेले वास्तव त्या दोघांमधील कथित प्रेम अन् सरळ भाषेतील टाइमपास उघड करणारे ठरले आहे.

२२ नोव्हेंबर २०२१

मेडिकलमध्ये इंटर्न डॉक्टर म्हणून सेवा देणाऱ्या ‘तिने’ दगाबाजी केली म्हणून त्याने तिची हत्या करण्यासाठी थेट तिच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. नशीब. पिस्तूल जाम झाल्याने गोळी सुटली नाही अन् ती बचावली. अजनी पोलिसांनी अटक करून त्याला कारागृहात डांबले.

२ डिसेंबर २०२१

प्रेमसंबंधातून प्रारंभी लग्नाचा वादा करणाऱ्या फरजानाने आता लग्न करण्यास नकार दिला. तिचे दुसरीकडे लग्न होणार ही भावनाच मुजाहिद अंसारीला क्रूर बनवून गेली. तू मेरी नहीं तो किसी की नहीं, असे म्हणत अंसारीने तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळून तिला संपवून टाकले. आरोपी मुजाहिद सध्या गणेशपेठ पोलिसांच्या कोठडीत आहे.

छताला टांगून ठार मारण्याचा प्रयत्न

मैत्रिणीने बोलचाल बंद केल्यामुळे एक गुन्हेगार संशयाने पछाडला. शुक्रवारी मध्यरात्री त्याने तिला तिच्याच स्कार्फने गळफास लावून छताला टांगून ठार मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मध्यरात्री कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

नाही मानत का... घे मग।

तू लग्न करत नाही का, घे मग, अशा भावनेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन दगाबाज प्रियकराविरुद्ध महिनाभरात आठ महिला- मुलींनी त्यांच्या प्रियकरांविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. सक्करदरा, मनीषनगर, कळमना, बेलतरोडी, जरीपटकासह विविध भागांतील या घटनांमधील तक्रार करणाऱ्या, तसेच आरोपींमध्ये अभियंता, डॉक्टर, नोकरदार अन् विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: crime case happens after friendship turns into love then fight and breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.