तारुण्यात केला गुन्हा, वृद्धापकाळी झाली अटक; ३९ वर्षांनंतर गावी परतले आणि अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 08:40 PM2023-06-26T20:40:29+5:302023-06-26T20:40:55+5:30
Nagpur News तारुण्याच्या जोमात मोर्चात सहभागी झालेल्या त्या दोघांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, जामिनावर सुटताच ते फरार झाले. त्यावेळी ते ऐन तारुण्यात होते. पोलिसांचा शोध सुरूच राहिला अन् अखेर ते वृद्ध झाल्यानंतर आता पोलिसांच्या हाती लागले.
नागपूर : तारुण्याच्या जोमात मोर्चात सहभागी झालेल्या त्या दोघांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, जामिनावर सुटताच ते फरार झाले. त्यावेळी ते ऐन तारुण्यात होते. पोलिसांचा शोध सुरूच राहिला अन् अखेर ते वृद्ध झाल्यानंतर आता पोलिसांच्या हाती लागले. भास्कर कुटे (वय ६१) आणि शंकर बोधळे (वय ६४) अशी त्यांची नावे आहेत.
फिल्मी वाटावी अशी ही घटना आहे.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांचा एक मोर्चा १९८४ ला विधानभवनावर धडकला होता. मोर्चा संपला अन् मोर्चेकरी आपापल्या गावाचा रस्ता धरू लागले. भास्कर आणि शंकर त्यांच्या सहकाऱ्यांसह रेल्वेस्थानकावर पोहोचले. ते सर्व दादर एक्स्प्रेसमध्ये दिसेल त्या डब्यात शिरले. काही जणांनी एसी कोच गाठला आणि रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांचे बर्थ बळकावले. ज्यांचे रिझर्वेशन होते, त्या प्रवाशांनी रेल्वे अधिकारी तसेच पोलिसांकडे तक्रार केली. गाडी रेंगाळल्याने मोठा तणाव निर्माण झाला. विनातिकीट दुुसऱ्यांच्या जागेवर बसलेले मोर्चेकरी ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिसांवरच हावी झाले. झटापट करतानाच जवळचे टिफीन तसेच अन्य वस्तूंनी पोलिसांवर हल्ला चढवला. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना त्यावेळी कसेबसे आवरून ताब्यात घेतले. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी त्यांना अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली. प्रकरण न्यायालयात गेले.
अखेर ते गावात परतले अन् ...
त्यात आरोपी असलेले भास्कर आणि शंकर नंतर पोटापाण्याच्या निमित्ताने इकडून तिकडे भटकू लागले. त्यांचा पत्ता मिळत नसल्याने पोलिसांनी त्यांचे वॉरंट काढले. मूळगावी, नातेवाइकांकडे निरोप ठेवले. ऐन तारुण्यात केलेल्या गुन्ह्याचा आता विसर पडला असल्यामुळे कुण्या एका कारणाने हे वृद्ध झालेले दोघे गावात पोहोचले. ही माहिती कळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने बुलडाणा जिल्ह्यात जाऊन या दोघांना अटक केली. त्यांना नागपुरात आणून कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्यांची कोठडीत (एमसीआर) रवानगी केली.
----