क्राईम ग्राफ घसरला
By admin | Published: July 13, 2016 03:27 AM2016-07-13T03:27:18+5:302016-07-13T03:27:18+5:30
जवळपास सर्वच मोठे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यातील गुंडांवर मोक्कासारखी कडक कारवाई करून गुन्हेगारीला
पोलीस आयुक्त : शहरातील गुन्हेगारीला लगाम
नागपूर : जवळपास सर्वच मोठे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यातील गुंडांवर मोक्कासारखी कडक कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याचे नागपूर पोलिसांनी प्रयत्न केले. त्याचमुळे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना यश मिळाले असे सांगून खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी वसुली, हाणामाऱ्या यासारखे गंभीर गुन्हे गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचा दावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी केला. ठाणेदारांची मासिक गुन्हेआढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
जनतेच्या मनात आपण सुरक्षित आहोत, ही भावना रुजविण्यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार नोंदवून त्याला न्याय देण्यात येईल. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात हयगय होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. गुन्हेगारी निपटून काढतानाच महिलांच्या भावनिकतेशी जुळलेल्या चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही पोलिसांनी यश मिळवले आहे. मात्र, पोलीस येथे थांबणार नाहीत. चेनस्रॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व ठाण्यांना देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यादव म्हणाले. शहर पोलीस दलात अधिकाऱ्यांची कमतरता नसल्याने आता अधिक प्रभावीपणे काम करण्याचे प्रयत्न करू, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.
अनेक मोक्का प्रकरणात गुन्हेगारांना जामीन मिळाला एवढेच नव्हे तर कोर्टाकडून फटकारही मिळाल्याची बाब पत्रकारांनी उपस्थित केली. त्यावर बोलताना, कोर्टाच्या आदेशावर भाष्य करता येणार नाही, असे ते म्हणाले. गुन्हेगारांवर मोक्का लावणे, त्यासंबंधाने भक्कम पुरावे गोळा करणे आणि शिक्षा होईल, असे प्रयत्न करणे हे पोलिसांचे काम आहे. या प्रक्रियेत कसलीही त्रुटी राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे यादव म्हणाले.
डब्बा ट्रेडिंग प्रकरणात पोलिसांना सूर गवसला नसल्याची सर्वत्र चर्चा असल्याकडे पत्रकारांनी लक्षात आणून दिले असता, या प्रकरणात आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कचे क्लोनिंग करण्यात आले. त्याचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल कधी येणार, हे पोलिसांच्या हातात नाही.
तो लवकर मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त म्हणाले. डब्बाप्रकरणात अनेकजण जुळले असल्याचे सांगितले गेले होते. तथापि, पहिल्या दिवशी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ झाली नाही, असा प्रश्न केला असता, हार्डडिस्कचा तज्ज्ञांकडून अहवाल मिळाल्यानंतर अनेक धक्कादायक घडामोडी अपेक्षित असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. या प्रकरणाच्या तपासाला दोन महिने झाले तरी रवी अग्रवाल आणि अन्य मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही, असाही प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना आयुक्त म्हणाले की, त्यांचा कसोशीने शोध घेतला जात आहे.